Mumbai Metro : बऱ्याच वर्षांच्या प्रतिक्षेनंतर आता मेट्रो 9 (दहिसर पूर्व ते भाईंदर) आणि 12 (कल्याण ते तळोजा) कार्यान्वित होण्यासाठी दोन महत्त्वपूर्ण मेट्रो कार डेपोच्या (Carshed) बांधकामासाठी हिरवा कंदील मिळाला आहे. आठवडाभरात, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) दोन महत्त्वाच्या मेट्रो डेपोच्या बांधकामासाठी महत्त्वाच्या जमिनींचा ताबा मिळवून एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. या डेपोमुळे दोन्ही मार्गावरील मेट्रो ट्रेनचे काम, देखभाल आणि दुरुस्ती सुलभ होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एमएमआरडीएकडून दहिसर ते मिरारोड दरम्यान 10.5 किमीची मार्गिकेची उभारणी केली जात आहे. या मार्गिकेचे काम वेगात सुरु असून बऱ्यापैकी काम पूर्ण झाले असतानाही कारशेडच्या जागेचा प्रश्न सुटत नव्हता. मेट्रो 9 मार्गिकेच्या कारशेडसाठी उत्तन, डोंगरीतील 59 हेक्टर जागा एमएमआरडीएच्या ताब्यात आली आहे. दहिसर ते मीरा-भाईंदर दरम्यान निर्माणाधीन मेट्रो-9 चा पहिला टप्पा या वर्षाच्या अखेरीस सुरू करण्याचे नियोजन मेट्रो प्रशासनाचे आहे. एमएमआरडीएचे आयुक्त एसव्हीआर श्रीनिवास यांनी दिलेल्या माहितीनुसार, मेट्रो-9 सोबतच मेट्रो-6 आणि 2बीचे कामही वेगाने सुरू आहे. या मार्गावरील मेट्रोचा पहिला टप्पा 2024 पूर्वी सुरू होऊ शकतो. मोर्वे आणि मुर्धा येथे मेट्रो-9 च्या प्रस्तावित डेपो भूखंडाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्यानंतर उत्तन येथे कारशेड बांधण्याचा निर्णय घेण्यात आला. उत्तनमध्ये कारशेड करण्यासाठी सुमारे 3 किमी कॉरिडॉर वाढविण्यात आला आहे.


मेट्रो 12च्या कारशेडची जागाही ताब्यात


दुसरीकडे मुंबई मेट्रो 12 साठी, राज्य सरकारने ठाणे जिल्ह्यातील निलजेपाडा येथील एकूण 47 हेक्टर जमीन विकास प्राधिकरणाकडे हस्तांतरित केली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. आता त्यानुसार ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी नुकतीच ही जागा एमएमआरडीएच्या ताब्यात देण्याचे आदेश दिले होते. कल्याण – तळोजा मेट्रो 12 मार्गिकेच्या आराखड्यात बदल करून आता ही मार्गिका नवी मुंबईतील पेंधरपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यानंतर आता या मार्गिकेतील कारशेडचा प्रश्न मात्र निकाली निघाला आहे. एमएमआरडीएने या मार्गिकेसाठी कारशेड पिसार्वेवरून कल्याण, शिळफाटा येथील निळजे-निळजेपाडा येथे उभारण्याचे ठरवलं आहे. 


सध्या, मुंबईत तीन मेट्रो मार्ग कार्यरत आहेत, ज्यामुळे लाखो मुंबईकरांचा प्रवास आरामदायी होत आहे. तसेच मेट्रो 4 आणि 4 ए (वडाळा-घाटकोपर-ठाणे-कासारवडवली-गायमुख) आणि मेट्रो 5 च्या ठाणे-भिवंडी मार्गासाठीही एमएमआरडीए जोरदार प्रयत्न करत आहे. मात्र या मार्गावरील मेट्रोसाठी एमएमआरडीएला जमिनीचा ताबा अद्याप मिळालेला नाही. सध्या, एमएमआरडीएने मेट्रो 4 आणि 4A आणि मेट्रो 5 साठी घोडबंदर रोडवरील मोघरपाडा आणि भिवंडीतील कशेळी येथे कार डेपोसाठी जमिनीची निवड केली आहे.