देवेंद्र कोल्हटकर, झी 24 तास, मुंबई:  पनवेल कोन गाव येथील सोडतीत विजेत्या गिरणी कामगार आणि त्याच्या वारसांसाठी महत्वाची अपडेट आहे. म्हाडाकडून 2016 मध्ये येथील 2417 सदनिकांची सोडत काढण्यात आली. सोडतीतील यशस्वी गिरणी कामगार/वारसांनी म्हाडा कार्यालयातून प्रथम सूचना पत्र आणि देकार पत्र म्हाडा कार्यालयातील गिरणी कामगार कक्षातून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सदनिका ताब्यात घेण्याची कार्यवाही लवकरात लवकर सरू करण्यासही सांगण्यात आले आहे.


तात्पुरते देकारपत्रे आले परत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या पत्रकानुसार सन 2016 मध्ये गिरणी कामगारांच्या सोडतीतील यशस्वी ठरलेल्या गिरणी कामगार / वारस यांना कागदपत्रे सादर करण्याकरिता प्रथम सूचना पत्रे पाठविण्यात आली होती. मात्र, विविध कारणांमुळे बरीच प्रथम सूचना पत्रे (FIL) कार्यालयास परत आलेली आहेत. त्याचप्रमाणे पात्र ठरविण्यात आलेल्या यशस्वी गिरणी कामगार / वारस यांना पाठविण्यात आलेली बरीच तात्पुरते देकारपत्रे (POL) सुद्धा या कार्यालयात विविध कारणांमुळे परत प्राप्त झाली आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबई मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे. 


'सदनिका ताब्यात घ्या'


सोडतीत यशस्वी झालेल्या ज्या अर्जदार गिरणी कामगार/वारस यांना प्रथम सूचना पत्रे तसेच तात्पुरते देकार पत्रे मिळालेली  नाहीत, त्यांनी म्हाडा कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील गिरणी कामगार कक्ष क्र. 204-205 येथून मूळ पत्रे/ साक्षांकीत प्रती हस्तपोच प्राप्त करून घ्यावी व त्यानंतर कागदपत्रे / विक्री  किंमतीचा भरणा तात्काळ  करावा. त्याचप्रमाणे ज्या यशस्वी गिरणी कामगार / वारसांनी देकरपत्रांच्या विहित कालावधीमध्ये सदनिकेच्या विक्री किंमतीचा भरणा केलेला नाही, त्यांनी विक्री किंमतीचा भरणा तात्काळ करून सदनिका ताब्यात घ्यावी. 


कागदपत्रे कुठे सादर कराल?


तसेच मौजे कोन , ता. पनवेल च्या सोडतीमधील यशस्वी / प्रतीक्षा यादीवरील गिरणी कामगारांची यादी म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे.  या यादीमध्ये नाव असून देखील अनेक यशस्वी गिरणी कामगार/वारसांनी अद्याप पात्रतेसाठी आवश्यक असणारी कागदपत्रे सादर केलेली नाहीत. अशा गिरणी कामगार/वारसांनी तात्काळ मुंबई बँकेच्या फोर्ट शाखेमध्ये कागदपत्रे सादर करण्याचे आवाहन मुंबई मंडळातर्फे करण्यात आले आहे.