सागर कुलकर्णी, प्रतिनिधी, झी मीडिया, मुंबई : मुंबईत म्हाडाच्या घरांसाठी मोठ्या संख्येनं अर्ज भरले जातात. मात्र यंदा म्हाडाच्या घरांसाठी मागवलेल्या अर्जांमध्ये 50 टक्क्यांनी घट झालीय. बांधकाम क्षेत्रातील मंदी आणि अल्प मध्यम उत्पन्न धारकांसाठी असलेली कमी घरं ही प्रमुख कारण यामागे आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत स्वत:च्या मालकीचं घर असावं असं इथं राहणा-या प्रत्येकाचं स्वप्न असतं. लॉटरीद्वारे लागणा-या म्हाडाच्या घरांद्वारे काहीजणांची स्वप्न सत्यातही उतरतात. दरवर्षी म्हाडाच्या घरांसाठी लाखो मुंबईकर अर्ज करत असतात. मात्र गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा म्हाडा लॉटरीला पन्नास टक्के कमी प्रतिसाद लाभलाय.


2016 मध्ये एकूण 952 म्हाडा घरांसाठी 2 लाख अर्ज आले होते. त्यातील एक लाख 35 हजार अर्जदारांनी पैसे भरले होते. यंदा एकूण  819 घरांसाठी सुमारे 78 हजार अर्ज दाखल झाले असून 52 हजार अर्जदारांनी पैसे भरले आहेत.


गेल्या वर्षी अल्प अत्यल्प उत्पन्न गटांतील 190 घरांसाठी 7 हजार अर्ज भरले गेले होते. यंदा अत्यल्प उत्पन्न गटासाठी केवळ आठ घरं असून त्यासाठी 12हजार अर्ज दाखल झाले आहेत.


तर अल्प उत्पन्न गटासाठी मागील वर्षी 418 घरांसाठी 56 हजार अर्ज दाखल झाले होते. तर यावर्षी या गटात 192चं घरी असून यासाठी 38 हजार अर्ज आले आहेत. मध्यम उत्पन्न गटासाठी गेल्यावर्षी 144 घरं होती यंदा या गटात केवळ 281 घरं आहेत.


रेरा कायदा, नोटबंदी, बांधकाम क्षेत्रातील मंदी या कारणांमुळे यंदा म्हाडा लॉटरीला अल्प प्रतिसाद लाभलाय. यंदा घरांच्या किमतींमध्येही वाढ झालीय. यामुळे आता म्हाडाची घरंही सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाऊ लागली आहेत. या महागड्या घरांमुळे मुंबईत हक्काचं घर वसवण्याचं स्वप्नही हळूहळू धूसर होऊ लागलंय.