`म्हाडा`च्या दुकानांच्या गाळ्यांचा लिलाव प्रथमच ऑनलाईन
ही बोली तीन दिवस खुली राहिल्यानंतर बंद होईल. त्यात कोणी बाजी मारली याची यादी १ जून रोजी जाहीर होईल
मुंबई : म्हाडाच्या दुकानांच्या गाळ्याचा लिलाव ऑनलाइन पद्धतीनं करण्याचे ठरवून ही प्रक्रिया यशस्वी करण्यासाठी पूर्ण तयारी म्हाडाने केली आहे. १० वर्षानंतर दुकानांसाठी घेण्यात येणाऱ्या लिलावासाठी प्रथमच ऑनलाइनचा वापर केला जात आहे. पारदर्शक पद्धतीने ही लॉटरी पार पाडण्यासाठी म्हाडाच्या आयटी विभागाने स्वतंत्रपणे सॉफ्टवेअर विकसित केले आहे. यापूर्वीही घरांच्या सोडतीसाठी वापरात आलेल्या सॉफ्टवेअरला विविध सरकारी विभागांकडून मागणी होती.
म्हाडाच्या मुंबई, कोकण मंडळाकडून २७४ दुकानांच्या गाळ्यांसाठी लिलाव जाहीर केला आहे. २८ मेपासून त्यास प्रत्यक्ष सुरुवात होणार असून ३१ मेपर्यंत ही ऑनलाइन लिलाव सुरू राहणार आहे. त्यासाठी म्हाडाच्या www.mhada.gov.in वेबसाइटवर जाउन इच्छुकांना नोंदणीची सुविधा आहे. त्यावर माहिती पुस्तिका, दुकानांचे पत्ते, नोंदणीसाठी प्रात्यक्षिकांचा समावेश असलेले व्हिडिओ आदी माहिती उपलब्ध केली आहे.
नोंदणीत ई-मेल, पॅन क्रमांक, मोबाइल क्रमांक देणे आवश्यक आहे. त्यातील एकेक टप्प्यावर जात असताना येणाऱ्या ओटीपीचा आधार घ्यावा लागणार आहे. ई-लिलावासाठी दुकानांची बोली लावण्यासाठी वेगवेगळे पर्याय आहे. म्हाडाने दुकानांसाठी ठरवलेल्या मूळ किंमतीच्या आधारेही तशी वर्गवारी केली आहे. बोली करताना सहभागी स्पर्धकांना मूळ रक्कमेत १० हजार रुपयांच्या पटीत वाढ करावी लागेल. त्यापेक्षा कमी रक्कमेच्या पटीतील बोली स्वीकारली जाणार नाही. या संपूर्ण घडामोडीत नेमकी कोणत्या व्यक्ती बोलीत सहभागी झाली आहे, ते अन्य सहभागींना कळणार नाही.
ही बोली तीन दिवस खुली राहिल्यानंतर बंद होईल. त्यात कोणी बाजी मारली याची यादी १ जून रोजी जाहीर होईल. लिलाव करताना शेवटच्या मिनिटांत बोली करुन सोडत जिंकण्याचा प्रयत्न होऊ नये म्हणूनही चोख बंदोबस्त केला आहे. कोणतीही बोली नोंदवल्यानंतर त्यापुढील १० मिनिटांचा कालावधी स्पर्धकांना मिळणार आहे. त्यामुळे बोलीत सहभागी होणाऱ्या प्रत्येकास समान संधी उपलब्ध होईल, असा म्हाडाचा दावा आहे.
म्हाडाने या सोडतीसाठी तयार केलेल्या सॉफ्टवेअरसाठी आयआयटीकडून प्रमाणपत्र मिळवले आहे. त्यात कोणताही दोष राहणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. या सॉफ्टवेअरमध्ये परताव्यासह अन्य गोष्टी सहज शक्य होऊन वेळेत बचत होणार आहे.