कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकताच मुंबईतल्या गटप्रमुखांचा मेळावा घेतला. या मेळाव्याकडे दसरा मेळाव्याचा (Dussehara Malava) ट्रेलर म्हणून पाहिलं जातंय. मात्र आता या मेळाव्यातील एका विषयाची जोरदार चर्चा सुरु आहे ती म्हणजे उद्धव ठाकरेंच्या अवतीभवती हातात फाईल घेतलेले रवी म्हात्रे (Ravi Mhatre). कधीकाळी प्रत्येक व्यासपीठावर उद्धव ठाकरेंसोबत मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) दिसायचे. पण आता रवी म्हात्रे दिसतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विशेष म्हणजे शिंदेंच्या बंडानंतर (Shinde Group) उद्धव ठाकरेंनी आपल्या गोटात आणि पक्षात अनेक बदल केल्याचं बोललं जातंय. त्यात जिथे नार्वेकर ठाकरेंसोबत दिसायचे तिथे आता म्हात्रे दिसतायत. त्यामुळे मिलिंद नार्वेकरांची जागा आता रवी म्हात्रे घेणार का अशी चर्चा आहे. ठाकरेंच्या आसपास वावरणारे रवी म्हात्रे कोण आहेत अशी चर्चा सुरु झालीय.


कोण आहेत रवी म्हात्रे?


रवी म्हात्रे बाळासाहेब ठाकरे यांच्या अत्यंत जवळचे होते. 
2004 पासून ते बाळासाहेबांचे सहाय्यक म्हणून काम पाहत होते
'मातोश्री'वर बाळासाहेबांकडून येणारे निरोप हे म्हात्रेंकडूनच यायचे. 
बाळासाहेबांसाठी फोन केला तर तो फोन म्हात्रेच आधी घेत असत. 
आमदार, खासदार, साध्या शाखाप्रमुखांची व्यथा, तक्रार ते बाळासाहेबांपर्यंत पोहोचवायचे. 
रवी म्हात्रे बाळासाहेब आणि शिवसैनिकांमधील दुवा होते
बाळासाहेबांच्या प्रत्येक कार्यक्रमाचं नियोजन म्हात्रेच पाहत होते.
बाळासाहेबांच्या निधनानंतरही रवी म्हात्रे ठाकरे कुटुंबासोबत होते. 



एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि समर्थक आमदारांनी बंड केलं तेव्हा त्यांचा रोख ठाकरेंच्या आसपासच्या माणसांवर होता. त्यात प्रामुख्यानं राऊत आणि नार्वेकर होते. ठाकरेंचा राईट हँड अशी नार्वेकरांची ओळख आहे. याआधीही अनेक नेत्यांनी शिवसेना सोडली त्यांचा रोख नार्वेकरांवर होता. शिंदेंच्या बंडानंतर पहिल्यांदा नार्वेकरांनाच मध्यस्थीसाठी पाठवण्यात आलं होतं पण नार्वेकर शिष्टाई करु शकले नाहीत, उलट शिंदे-ठाकरे संघर्ष टीपेला असताना नार्वेकर-फडणवीस आणि नार्वेकर-शिंदे भेट झाली होती.


त्यामुळे कुठेतरी उद्धव ठाकरे नार्वेकरांवर नाराज असल्याचं बोललं जातंय. त्यामुळेच ठाकरेंनी आपली टीम बदलायला सुरुवात केलीय अशी चर्चा आहे. म्हणूनच नार्वेकरांच्याऐवजी रवी म्हात्रे ठाकरेंसोबत जास्तवेळा दिसतात, नार्वेकरांची जागा म्हात्रेंनी घेतली याचं कवित्व रंगलंय.