`MIM`ची तिरंगा रॅली मुंबई वेशीवर रोखणार, टोल आणि चेकनाक्यावर कडक पोलीस बंदोबस्त
MIM Rally : एमआयएमची (MIM) मुंबईत तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. मात्र, मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या वेशीबाहेर रॅलीला रोखण्यात येणार आहे.
मुंबई : MIM Rally : एमआयएमची (MIM) मुंबईत तिरंगा रॅली काढण्यात येणार आहे. मात्र, मुंबईत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. असे असताना रॅली काढण्याचा निर्धार खासदार इम्तियाज जलील यांनी केला आहे. त्यानुसार राज्यातून त्यांचे अनेक कार्यकर्ते मुंबईकडे निघाले आहेत. मुंबई पोलिसांनी जमावबंदीचे आदेश लागू केल्यानंतर कार्यकर्त्यांना मुंबईच्या सीमेबाहेर रोखण्यात येणार आहे. दरम्यान, तिरंगा रॅलिसाठी धुळ्याहून मुंबईला निघालेल्या एमआयएम कार्यकर्त्यांना पोलिसांनी मालेगावत स्थानबद्ध केले आहे. (MIM's Rally to be stopped at Mumbai gates, strict police security at toll plazas)
या ठिकाणी रोखणार रॅली
मुंबईच्या दिशेने औरंगाबादहून एमआयएमचे कार्यकर्ते गाड्या घेऊन रवाना झाले आहेत. मुस्लीम आरक्षण आणि वक्फ मालमत्तेचे रक्षण व्हावे अशी एमआयएमची मागणी आहे. खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली MIM कडून मुंबईच्या दिशेने गाड्यांची मोठी रॅली निघाली आहे. अहमदनगर येथे शहरात प्रवेश न करता शहराबाहेर असलेल्या शेंडी बाह्यवळण रस्त्यावरून शहराबाहेर जात ही रॅली पुण्याच्या दिशेने पुढे निघाली. तर मुंबईत रॅलीला परवानगी नाकारली असून, जमावबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईच्या मुलुंड चेकनाक्यावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच नवी मुंबईतील वाशी टोल नाक्यावर आणि मानखुर्द येथे कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
एमआयएमची राज्यातील सर्व विभागातून तिरंगा रॅली मुंबईला निघाली आहे. सर्व चार चाकी गाड्यांवर तिरंगा ध्वज लावण्यात आलेत. मुंबईत रॅलीसाठी परवानगी नाकारण्यात आली. त्यामुळे सरकारने आमची रॅली दडपण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु रॅली होणार आणि संध्याकाळी सभा सुद्धा घेणार असल्याचे इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे.
मालेगावत कार्यकर्त्यांना केले स्थानबद्ध
तिरंगा रॅलिसाठी धुळ्याहून मुंबईला निघालेल्या एमआयएम कार्यकर्त्यांना पोलिसांनी मालेगावत स्थानबद्ध केले आहे. एमआयएमचे धुळ्याचे आमदार फारूक शाह आणि उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष डॉ. खालिद परवेज यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली काढण्यात आली होती. मात्र मालेगावात 50हून अधिक कार्यकर्त्यांना स्थानबद्ध केल्यानंतर त्यांनी धरणं आंदोलन केलं. त्यामुळे या ठिकाणी काही काळ तणाव निर्माण झाला होता.