गिरीश महाजनांचा मुंबईच्या महापौरांवर पलटवार
मुंबई : येत्या पावसाळ्यात मुंबई तुंबली तर त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, अशा शब्दांत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी सरकारवर हल्लाबोल चढवलाय. या प्रकरणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
महापौरांनी आज पश्चिम उपनगरातील नालेसफाई कामांची पाहणी केली. त्यावेळी त्यांनी सरकार आणि एमएमआरडीएच्या कारभारावर टीकेची झोड उठवली.
महापालिकेची परवानगी न घेता सुरू असलेल्या मेट्रोच्या कामांमुळं पर्जन्य जलवाहिन्या उखडल्या गेल्यात. त्या पूर्ववत करण्याची जबाबदारी एमएमआरडीएची आहे. मेट्रोच्या कामांमुळं मुंबई तुंबली तर त्याची जबाबदारी महापालिकेची नाही, असं महापौरांनी स्पष्ट केलं.
पावसाळा तोंडावर येऊन ठेपला असला तरी अजून नालेसफाईची ५० टक्केही कामं पूर्ण झालेली नाहीत, हे त्यांनी मान्य केले. येत्या १० दिवसांत महापौर पुन्हा नालेसफाईचा पाहणी दौरा करणार आहेत. तोपर्यंत कामं पूर्ण झालं नाहीत तर संबंधित ठेकेदारांवर कारवाई करणार, असा इशाराही महाडेश्वर यांनी दिलाय.
दरम्यान, महापौरांच्या या वक्तव्यावर जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी तिखट प्रतिक्रिया व्यक्त केलीय. यापूर्वी मेट्रोची कामं सुरू नव्हती. त्यावेळी मुंबई का तुंबली? रस्त्यांवर पाणी का साचलं? असा सवाल त्यांनी महापौरांना केलाय.