जळगाव : हातात बंदूक घेऊन जळगावमध्ये बिबट्याचा माग काढणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या हकालपट्टीची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं केलीय. 


मंत्रिमंडळातून हकालपट्टीची मागणी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्वसंक्षणासाठी दिलेल्या बंदुकीचा गैरवापर करत, त्यांनी वन्यजीव कायद्याचा भंग केलाय. त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केलीय.


बिबट्याला मारण्याचे आदेश


जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील वरखेडेमध्ये नरभक्षक बिबट्याला मारण्याचे आदेश सरकारनं दिलेत. सरकारमधील मंत्री गिरीश महाजन स्वतःच्या संरक्षणासाठी दिलेली बंदूक घेऊन बिबट्याला मारायला बाहेर पडल्याचा व्हिडिओ सध्या वायरल झालाय. त्यावर राष्ट्रवादीनं जोरदार आक्षेप घेतलाय. तर लोकांच्या संरक्षणासाठी आपण पिस्तुल हाती घेतलं. मला स्टंट करायचा नव्हता, तर खबरदारी म्हणून हे केलं, असा दावा गिरीश महाजनांनी केलाय.


प्रसिद्धीसाठीचा स्टंट आहे का?


सरकारचे हे आदेश शिरसावंद्य मानत राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे स्वतः हातात बंदूक घेऊन मोहीमेवर निघाले होते. हे मंत्र्यांचं काम आहे का, असा सवालही केला जातोय... एकीकडं वन विभाग बिबट्याला जेरबंद करण्यात अपयशी ठरत असताना, हा गिरीश महाजनांचा प्रसिद्धीसाठीचा स्टंट आहे का, अशी विचारणा केली जात आहे.