मुंबई :  मुंबईत आज ईडीने (Enforcement Directorate) 10 ठिकाणांवर छापे मारण्यात आले. हवाला, मनी लाँडरिंग, ड्रग तस्करी या संबंधी हे छापे मारण्यात आलेत. दाऊदच्या (Dawood Ibrahim) निकटवर्तीयांवर हे छापे मारण्यात आलेत. पहाटे चार वाजल्यापासून ईडीने मुंबईत विविध ठिकाणी छापे टाकले. एका व्यक्तीला चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची सूत्रांची माहिती आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील एका मंत्र्याचा या प्रकरणात सहभाग असल्याचा ईडीला संशय आहे. हवाला प्रकरणात या मंत्र्याची ईडीकडून चौकशीही करण्यात आली आहे. 


मुंबईत सुरु असलेल्या ईडी कारवाईवर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राष्ट्राच्या सुरक्षेसंदर्भात काही विषय असतील आणि काही गंभीर गोष्टी असतील, आणि केंद्राकडे तशी काही माहिती असेल, तर केंद्रीय तपास यंत्रणांना सहकार्य करणं गरजेचं आहे. तशी काही कारवाई सुरु असेल तर केंद्र सरकार आणि राज्य सरकारने एकत्र काम करायला हवं, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


काही राजकीय नेत्यांची नावं समोर येतील असं विचारला असता संजय राऊत यांनी काही नावं समोर येतील की घुसवली जातील, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये हा मोठा प्रश्नचिन्ह आहे, असं म्हटलं आहे.


राष्ट्रीय सुरक्षा हा गंभीर आणि नाजूक विषय असतो, त्यावर तपास सुरु असतान त्यावर फार काही बोलणं चांगलं नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. 


गुजरातमध्ये इतका मोठा घोटाळा झाला आहे, देशातील सर्वात मोठा बँक घोटाळा झाला आहे, आम्ही बघतोय की ईडी तिकडे कधी जातेय, २५ हजार कोटींचा घोटाळा आहे. तो दाबण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून कोणी प्रयत्न केला आहे. कोण आहेत ते लोक ज्यांनी दोन वर्ष एफआयआर दाखल करु दिला नाही, ईडीने तिकडे जाऊनही चौकशी करावी असंही संजय राऊत यांनी सांगितलं.


शिवसेना कोणाची नावं घेणार?
आज सर्वांचं लक्ष लागलंय ते शिवसेना नेते संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेकडे. आज संध्याकाळी 4 वाजता राऊत पत्रकार परिषद घेऊन एक गौप्यस्फोट करणार आहेत. कालच राऊतांनी भाजपला धमकीवजा इशारा दिलाय. सध्या जेलमध्ये असलेल्या अनिल देशमुखांच्या जागी भाजपचे साडेतीन नेते लवकरच तुरुंगात असतील, असा बॉम्बगोळा राऊतांनी टाकलाय...त्यामुळे ते भाजपचे साडेतीन नेते कोण आहेत? राऊत आज कोणता बॉम्ब टाकणार याचीच उत्सुकता सगळ्यांना लागलीय.