मुंबई : देशातील सर्वाधिक कोरोना रुग्णंख्या एकट्या मुंबईत आहे. दिवसेंदिवस मुंबईत वाढणारा कोरोनाग्रस्तांचा आकडा मोठी चिंतेची बाब ठरते आहे. मात्र मुंबईतल्या झोपडपट्टीमध्ये सरासरी सुमारे 57 टक्के लोकांमध्ये कोरोनाच्या अँटीबॉडीज तयार झाल्याचं सेरो सर्व्हेतून समोर आलं आहे. त्यामुळे झोपडपट्टीतील 57 टक्के लोकांना कोरोना होऊन गेल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. तर बिगर झोपडपट्टी भागातील सरासरी 16 टक्के लोकांमध्ये अँटीबॉडी तयार झाल्याचं पुढे आलं आहे. त्यावरुनच भाजपचे आशिष शेलार यांनी कोरोना रुग्ण संख्येवरुन राज्य सरकारला टोला लगावला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आशिष शेलार यांनी, 40% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले? असं ट्विट करत मुंबई महापालिकेला सवाल केला आहे. तसंच 1 लाख अँटीबॉडी चाचण्या करा, सत्य समोर येईल असं म्हणत त्यांनी सरकारला टोला लगावला आहे. 


शेलार यांनी ट्विट करत 'नीती आयोग आणि मुंबई पालिकेच्या 3 वाँर्डातील अँटीबॉडी सर्वेक्षणात झोपडपट्टीत 57% तर इमारतीमध्ये 16% जणांना कोरोना होऊन गेल्याचे उघड. तर खाजगी लँबच्या सर्वेत सुमारे 25% लोकांना कोरोना होऊन गेलाय? म्हणजे 40% मुंबईकर स्वबळावर कोरोनामुक्त झाले? झोपडपट्टीत शौचालयांची स्वच्छता नसल्याने, इमारतीमध्ये जंतूनाशक फवारणी बंद केल्याने कोरोना वाढला, चाचण्यांची संख्या जेव्हा आवश्यक होती तेव्हा वाढवली नाही. आता चाचण्या वाढवून कोरोना होऊन गेला सांगताय..? यात तुम्ही काय करुन दाखवले?' असा सवाल त्यांनी केला आहे.