Maharashtra Assembly : विधानसभा अधिवेशनात आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी बंडखोरी का केली याबाबत आज पहिल्यांदाच मौन सोडलं, तसंच आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि संजय राऊत (Sanjray Raut) यांनी केलेल्या आरोपांना जोरदार फटकेबाजी करत उत्तरही दिलं. चार लोकांच्या टोळक्यानं उद्धव ठाकरेंना वहावत नेलं, माझी त्यांना विनंती आहे की, पट्टी बांधून तुम्हाला धृतराष्ट्राप्रमाणे सांगत आहे त्यांना दूर करा असं आवाहन गुलाबराव पाटिल यांनी केलं.
 
शिवसेनेतील अजून काही जण आमच्याकडे येतील अशी स्थिती आहे असाही दावाही गुलाबराव पाटील यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चार लोकांनी उध्दव साहेबांना वेडे केलं आहे,  जे आमच्या मतांवर निवडून येतात त्यांनी आमची लायकी काढली, इतकी वर्ष शिवसेनेत काम केलं, त्याची ही बक्षिसी? असा सवाल करतानाच आजूबाजूच्या कोंबड्यांना बाजूला करा, मग बघा. शिवसेना कशी वाढतेय, असं गुलाबराव पाटील म्हणाले. 


याआधी नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे गेले तेव्हा उठाव झाला, मग आता काय झालं? आम्ही सत्तेतून बाहेर जातो तरी बंडखोर आहे म्हणता, असं सांगत आम्ही बंड केलेला नाही, आम्ही उठाव केलाय असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.


चार मतं मिळवण्याची लायकी नाही ते आम्हाला बोलतात, आम्ही फार मोठं आव्हान घेऊन बाहेर पडलो आहोत. एकटे एकनाथ शिंदे शिवसेना वाचवण्यासाठी फिरत होते. मोदींनी 50 आमदार असलेल्या माणसाला मुख्यमंत्री करुन बाळासाहेबांचं स्वप्न पूर्ण केलं याबद्दल मी त्यांचा आभारी आहे असंही गुलाबराव पाटील म्हणाले.


शिवराळ भाषेत आमच्यावर टीका करण्यात आली. एकनाथ शिंदे सत्तेसाठी गेले असं बोलण्यात आलं. अहो त्यांचं चरित्र वाचा. आज बाळासाहेबही त्यांना आशीर्वाद देत असतील असं गुलाबराव पाटील म्हणाले.


फडणवीस मुख्यमंत्री असताना नगर पंचायत निवडणुकांमध्ये भाजपा पहिल्या स्थानावर होती आणि आमचा मुख्यमंत्री असताना शिवसेना चौथ्या क्रमांकावर फेकली गेली. शिवसेना रसातळाला चाललीय तिला वाचवण्यासाठी आम्ही उठाव केला. एकनाथ शिंदेंसोबत 20 आमदार गेले. आम्ही रुग्णवाहिकेतून गेलो, आम्हाला उठाव करायचा होता. 


भाजपासोबत युती राहावी यासाठी आम्ही प्रयत्न केले. शिंदे तर पाच वेळा गेले. फटाक्याची वात आत्ता लागलेली नाही. आमदारांची नाराजी आम्ही सांगत होतो. कोणी फोन उचलायचा नाही अशी खंतही गुलाबराव पाटील यांनी बोलून दाखवली.


आम्ही बाळासाहेबांची शिवसेना जिवंत ठेवणार आहोत. आम्हाला गटारीचं पाणी, प्रेतं अशा धमक्या देण्यात आल्या. आम्ही काही लेचेपेचे नाही. हातात जोर असणारा माणूस येतो आणि सत्तेत सामील होतो असा इशारा गुलाबराव पाटील यांनी दिला. शिवसेना संपत असेल तर ती वाचवण्याची जबाबदारी आमची आहे असंही ते म्हणाले.


मराठी माणसाच्या हक्कांसाठी आणि हिंदुत्वाचं रक्षण करणारी संघटना म्हणजे शिवसेना. बाळासाहेबांकडे पाहून आम्ही संघटनेत आलो. लोकांची सेवा करण्यासाठी सत्ता हे साधन समजून काम करावं लागेल असं बाळासाहेबांनी सांगितलं होतं. माझ्यासारख्या टपरीवाल्यावर टीका केली गेली. धीरुभाई अंबानीही पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायचे, मुख्यमंत्री रिक्षा चालवायचे हा इतिहास आहे अशी आठवण गुलाबराव पाटील यांनी करुन दिली.