राज ठाकरेंसाठी कुणी लावला ट्रॅप? बृजभूषण ट्रॅपमागे पवारांचा अदृश्य हात?
अयोध्या ट्रॅपवरून मनसे-राष्ट्रवादीत फोटो वॉर
Maharashtra Politics : अयोध्या दौऱ्याला विरोध करण्यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवण्यात आल्याचा आरोप मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी पुण्यातील सभेत केला होता. त्यानंतर आता ही रसद राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुरवल्याचा गंभीर आरोप आता मनसेनं केला आहे. त्यावरून राज ठाकरे आणि शरद पवार यांच्यात वादाचा नवा आखाडा रंगण्याची चिन्हं आहेत...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनंच एक फोटो ट्वीट करून त्याबाबतचा खुलासा केला आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह, राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळेंचा यांचा एक फोटो मनसेने ट्विट केला आहे. राज ठाकरेंना ट्रॅपमध्ये अडकवण्यामागं शरद पवारांचाच हात होता, असं दाखवण्याचा प्रयत्न मनसेकडून होतोय...
राष्ट्रवादी काँग्रेसनंही फोटोला फोटोनंच प्रत्युत्तर दिलं आहे. राष्ट्रवादीनं राज ठाकरे आणि शरद पवारांचे जुने फोटो ट्विट केले. एवढंच नव्हे तर संदीप देशपांडे आणि शरद पवारांचेही फोटो व्हायरल केले. तर कुस्ती संघटनेचे अध्यक्ष असलेले शरद पवार आणि पदाधिकारी असलेले बृजभूषण सिंह यांच्या फोटोचा राजकीय संबंध लावू नये, असं गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं..
मनसे आणि राष्ट्रवादीत अशी कुस्ती रंगली असताना, भाजपनं या वादातून अंग काढून घेतलं आहे. बृजभूषण यांचा विरोध हे त्यांचं वैयक्तिक मत होतं, भाजपनं अशी भूमिका घेतलेली नव्हती, असं भाजपनं स्पष्ट केलंय..
अयोध्या दौरा स्थगित होण्याचं खापर मनसेनं सरळसरळ शरद पवारांवर फोडलं आहे. यानिमित्तानं मनसे आणि राष्ट्रवादीनं एकमेकांविरोधात शड्डू ठोकलेत. या कुस्तीत कोण कुणाला कशी धोबीपछाड देतं, ते आता पहायचं.