देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मनसे नेते अमित ठाकरे यांनी 'जेतवन' या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी आरोग्य विषयक अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. कोरोना आणि अन्य आजारांच्या उपचारासाठी जी रुग्णालये कार्यरत आहेत, त्यांच्या बेड्सची क्षमता, स्पष्टपणे नागरिकांना कळावी यासाठी एक ऍप विकसित करावं, याबाबत भेटीदरम्यान चर्चा करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याशिवाय, बंधपत्रित वैद्यकीय अधिकारी आणि बंधपत्रित अधिपरिचारिका यांच्या पगारातील कपात रद्द करुन त्यांचा पगार पूर्ववत करावा, अशी मागणीही अमित ठाकरे यांनी आरोग्यमंत्र्यांना केली.


प्रत्येक रुग्णाला कोणत्याही परिस्थितीत अॅम्ब्युलन्स उपलब्ध करुन द्यायलाच हवी. प्रत्येक रुग्णालयात पोलीस कर्मचाऱ्यांसाठी काही बेड्स आरक्षित ठेवावेत. आणि त्यांचा संपूर्ण वैद्यकीय खर्च शासनानेच करावा, असा मुद्दाही अमित ठाकरे यांनी मांडला. या सर्व विषयांवर, मुद्द्यांवर आरोग्यमंत्र्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर हे विषय मार्गी लावण्याचं आश्वासन अमित ठाकरे यांना दिलं आहे.



दरम्यान याआधीदेखील अमित ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं होतं. कोरोनाचे आणि इतर आजारांच्या रुग्णांच्या मदतीसाठी सरकारने रुग्णालयाबाबतची सगळी माहिती देणारं मोबाईल ऍप तयार करावं, राज्यात कोरोनासाठी आणि इतर आजारांसाठी जी हॉस्पिटल आहेत, त्यांच्या बेडची क्षमता नागरिकांना माहिती नाही. ऐन आजारात रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना आमच्या हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध नाहीत, तुम्ही दुसऱ्या रुग्णालयात जा, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या ऍपमध्ये कोरोना आणि अन्य आजारांच्या हॉस्पिटलची माहिती आणि बेडची माहिती द्यावी. ही माहिती रोज अपडेट केल्यास रुग्णांचे आणि त्यांच्या नातेवाईकांचे हाल होणार नाहीत, अशी मागणी अमित ठाकरेंनी या पत्रात केली होती.