मुंबई  : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल औरंगाबादमध्ये झालेल्या जाहीर सभेत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे. तीन तारखेपर्यंत हे ऐकले नाहीत तर चार तारखेला सगळीकडे हनुमान चालिसा ऐकू आलीच पाहिजे असं आवाहन मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आता राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या सभेची चौकशी सुरू झाली आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या भाषणाचा अभ्याससुद्धा सुरू झालाय. स्थानिक पोलिसांकडून भाषणातील मुद्दे, जमलेली गर्दी, आवाजाची मर्यादा याबाबत काल रात्रीपासून पोलीस अभ्यास करतायत, माहिती घेतायत. 


औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरे यांच्या सभेपूर्वी 16 अटी घातल्या होत्या त्यापैकी किती अटींचे पालन झाले आहे आणि किती अटीचे उल्लंघन झाले आहे हे तपासलं जातंय. अटीचे उल्लंघन झालं असल्यास काय कारवाई करायची याबाबतचा येत्या दोन दिवसात निर्णय होणार आहे. 


राज ठाकरेंच्या कालच्या औरंगाबाद सभेतल्या भाषणाचे व्हिडिओ तपासून पाहणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलंय.  4 मे च्या अल्टीमेटमबाबत उद्या मुंबईत पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यात पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल असं गृहमंत्री वळसे पाटील यांनी म्हटलंय.  धमक्या देणं योग्य नाही असंही वळसे पाटील म्हणाले.


राज ठाकरे यांचा इशारा
महाराष्ट्रात दंगली घडवायची इच्छा नाही. मुस्लीम समाजानेही ही गोष्ट समजून घेण्याची गरज आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. लाऊड स्पीकर हा सामाजिक विषय आहे, धार्मिक विषय नाही. लाऊड स्पीकर या विषयाला तुम्ही धार्मिक विषय देणार असाल तर त्याचं उत्तर आम्हाला धर्मानेच द्यावं लागेल हे लक्षात ठेवा असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. 


आमची इच्छा नसताना आम्हाला टोकाची भूमिका घ्यायला लावू नका, महाराष्ट्रातली शांतता आम्हाला बिघडवायची नाही, इच्छाही नाही आणि गरजही नाही असं राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात सांगितलं.


देशतील हिंदु बांधवांना विनंती आहे, मागचं पुढचं का बघू नका, हे भोंगे उतरले गेलेच पाहिजेत, सगळ्या धार्मिक स्थळांवरचे. अभी नही तो कभी नाही, हिंदु बांधवांना विनंती आहे, तीन तारखेपर्यंत हे ऐकले नाहीत तर चार तारखेला सगळीकडे हनुमान चालिसा ऐकू आलीच पाहिजे असं आवाहन राज ठाकरे यांनी आपल्या भाषणात केलं.