Raj Thackeray : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या आवाजात दुसरा टीझर जारी, मनसेच्या उद्याच्या सभेत काय वाजणार?
मशिदीवरील भोंग्यावरून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवाजीपार्क येथील गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणाची चर्चा अजूनही सुरु आहे. यातच आज मनसेने शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील दुसरा टीझर जारी केलाय.
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची गुढीपाडव्याला शिवाजी पार्क येथे जाहीर सभा झाली. या सभेनंतर राज ठाकरे यांच्यावर भाजपची 'टीम बी' असल्याचा आरोप करण्यात आला. शरद पवार, उद्धव ठाकरे यांनीही राज ठाकरे यांच्यावर टीका केली.
शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी राज ठाकरे सज्ज झाले आहेत. १२ तारखेला ठाण्यात होणाऱ्या सभेसाठी ठिकठिकाणी 'उत्तर सभा' असे बॅनर्स लावण्यात आले आहेत. तसेच, डोंबिवलीचे मनसे आमदार राजू पाटील यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आवाजातील दुसरा टीझर जारी केलाय.
शिवाजी पार्क येथील सभेनंतर शरद पवार यांनी राज यांच्यावर टीका करताना एखादी सभा घेऊन बोलतात आणि गायब होतात अशी टीका केली. तर, उद्धव ठाकरे यांनी देशात आणखी एक बनावट हिंदुहृदयसम्राट बनविण्याचा प्रयत्न भाजप करत असल्याचा आरोप केला होता.
परंतु, राज ठाकरे यांची शिवाजी पार्क येथील सभा चर्चेत आली ती मशिदीवरील भोंग्यावरून. पुण्याचे शहर अध्यक्ष वसंत मोरे आणि काही मुस्लिम पदाधिकाऱ्यांनी राजीनामेही दिले. त्यातच उद्या ठाण्यात लगेचच दुसरी सभा होत आहे. यामुळे राज ठाकरे नेमका कुणावर निशाणा साधणार याकडे लक्ष लागलं आहे.
ठाण्यात सभेची तयारी म्हणून मनसैनिकांनी मोठ मोठ्या एलईडी स्क्रीन लावल्या आहेत. त्यामुळे एकेकाळी 'लाव रे तो व्हिडिओ'च्या माध्यमातून नरेंडे मोदी यांच्यावर टीका करणारे राज ठाकरे उद्या कुणाची पोलखोल करणार याचीच चर्चा आतापासून सुरु झालीय.