`टांगा पलटी घोडे फरार...`, मनसे आमदार राजू पाटील यांचं सूचक ट्वीट
शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे.
मुंबई: शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्याचं राजकारण ढवळून निघालं आहे. महाविकास आघाडी सरकार टिकणार की पडणार? या चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्यात भाजपाचं सरकार येणार का? याबाबतही चर्चा सुरु आहे. बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गटनेतेपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. अजय चौधरी यांना शिवसेनेचे नवे गटनेते बनवण्यात आलं आहे. असं असताना मनसेच्या एकमेव आमदार असलेल्या राजू पाटील यांनी ट्वीट केलं आहे. या ट्वीटमुळे भविष्यातील घडामोडींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
"टांगा पलटी घोडे फरार …" असं ट्वीट करत आनंद सेना? असा हॅशटॅग टाकला आहे. यामुळे एकनाथ शिंदे आनंद सेना स्थापन करणार का? असं राजू पाटील यांना सुचवायचं आहे.
शिवसेनेतील आजवरचे हे सर्वात मोठं बंड असणार आहे. एकाच वेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत 35 आमदार असल्याची चर्चा आहे. या आमदारांची भूमिकाही आता समोर आली असून त्यांना काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरचं सरकार अमान्य असल्याचं कळत आहे. भाजपबरोबर गेल्यास आम्ही अजूनही शिवसेनेसोबत असल्याची भूमिका बंडखोर आमदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे.