राज ठाकरेंचा कडक इशारा; दिली १५ दिवसांची मुदत, नंतर बघाच...
मोर्चा काढण्यावर मनसे ठाम
मुंबई : एलफिन्स्टन चेंगराचेंगरीत २३ जणांचा बळी गेल्यानंतर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संताप मोर्चा काढला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. मोर्चाला संबोधित करताना रेल्वे प्रशासनाला परखड इशारा दिलाय. मध्य रेल्वे-पश्चिम रेल्वेवरचे फेरीवाले १५ दिवसाच्या आत उठवा नाही तर १६ दिवशी माझे सहकारी ते काम करतील. आजचा मोर्चा हा शांततेत काढला, जर यंत्रणा काम करणार नसतील तर पुढचा मोर्चा शांततेत निघणार नाही, असा इशारा राज ठाकरेंनी दिला.
बुलेट ट्रेनला पहिल्यांदा विरोध करणारा माणूस मीच होतो, नंतर बाकीचे पोपट बोलायला लागले, अशी टीका विरोधी पक्षांवर केलेय. दरम्यान, केंद्रीय सुरेश प्रभू यांनी बुलेट ट्रेनला विरोध केला म्हणून त्यांना काढून टाकले. फक्त २-३ माणसं देश चालवणार का, असा सवाल राज ठाकरे उपस्थित केले.
रेल्वेची अवस्था अत्यंत बिकट आहे. रेल्वेला निवेदने देऊन सुद्धा काहीही उपयोग होत नाही. ती चेंगराचेंगरी पाहवत पण नव्हती, काय दयनीय परिस्थिती करून ठेवलीय देशाची! रेल्वेच्या समस्या नव्या नाहीत, किती वेळा लोकांनी मांडल्या पण काही नाही. आता मीच १५ दिवसांची मुदत देतो, १६ व्या दिवशी माझे सहकारी काम चोख पार पाडतील, असा थेट इशारा दिलाय.
सरकार बदलतात. देशातील न्यायाधिशांना माझी विनंती आहे की, तुमची कामे कोणाच्या दबावाखाली घेऊ नका. थापाडे मोदींनी काहीही केले नाही. देशात आर्थिक मंदी आणली. गव्हर्नर उर्जित पटेल म्हणतात देशात मंदी वाढणार म्हणजे काय बेरोजगारी वाढणार, हे या मोदी सरकारचे काम?
नितीन गडकरी म्हणतात अच्छे दिन हे गळ्यातलं अडकलेलं हाड म्हणजे अच्छे दिन येणारच नाहीत! मोदींवर माझ्यासकट या देशाने विश्वास टाकला पण संपूर्णसत्ता देऊन काय कारभार चालू आहे म्हणून माझा संताप आहे. महिलांसाठी गाड्या वाढवा सांगितलं तर अधिकारी लिहून घेत होते जसं आम्ही काही नवं सांगितलं, तुम्हाला नाही कळत? आजचा मोर्चा हा रेल्वेपुरता मर्यादित नाही सरकार बदललं तरी परिस्थिती जैसे थे म्हणून माझा संताप. किड्या-मुंग्यांसारखी माणसं मरतायत आणि यांच्या उच्चस्तरीय बैठका काय करायच्या, असा सवाल विचारलाय.