`...तर टोलनाके जाळून टाकू`; राज ठाकरेंचा शिंदे सरकारला इशारा
Raj Thackeray : मुंबईच्या एन्ट्री पॉईंटवर असलेल्या टोलनाक्यांवर झालेली टोल दरवाढ रद्द करण्याच्या मागणीसाठी मनसेने आंदोलन केलं होतं. त्यानंतर आता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारला इशारा दिला आहे.
Mumbai Toll Issue : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि भाजपा सरकारवर निशाणा साधत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी ठाणे आणि मुंबईतील टोलच्या (Toll) वाढीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. जर टोलनाक्यांवरुन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) सांगितलेल्या वाहनानां टोल आकारला तर ते जाळून टाकू असा इशाराच राज ठाकरे यांनी सरकारला दिला आहे.
1 ऑक्टोबरपासून मुंबईतील पाच एंट्री पॉईंटवर टोल आकारणी वाढवल्याच्या निषेधार्थ मनसेचं आंदोलन सुरु आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली या टोलवाढीविरोधात आंदोलन सुरु आहे. अविनाश जाधव यांच्या उपोषणानंतर आता राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत सरकारला इशारा दिला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी टोलबाबत आश्वासनं दिलेल्या नेत्यांची भाषणे दाखवली.
"2010 ला आम्ही टोलधाडीविरोधात आम्ही आंदोलन सुरु केलं. आमच्या आंदोलनानंतर अधिकृत आणि अनधिकृत असे 67 टोल नाके बंद झाले. आणि ते टोलनाके आमच्या रेट्यामुळेच झाले. कुठल्याच सरकारच्या मनात टोल बंद करायची इच्छा नव्हती पण आमचा रेटा इतका होता की टोल बंद करावेच लागले. उद्धव ठाकरे ते देवेंद्र फडणवीस ते अजित पवार सगळ्यांनी टोलमुक्त महाराष्ट्र करू अशी आश्वासनं दिली. पण तरीही टोल बंद होत नाही कारण ह्यात प्रत्येकाचं अर्थकारण सामील आहे. त्यामुळे रस्ते कितीही खराब असले तरीही हे सगळे राजकीय पक्ष कधीच टोल बंद होऊ देणार नाहीत. पण ह्यावर लोकं कधी यावर जागृत होणार?," असा सवाल राज ठाकरेंनी केला.
"मला अजूनपर्यंत येऊन कळलेलं नाही ही माणसं प्रत्येक वेळी येऊन टोलमुक्त महाराष्ट्र करु असं सांगतात. यांची सगळ्यांची सरकारे येऊन गेली पण आजपर्यंत ही गोष्ट झालेली नाही. राजकारणातल्या अनेक लोकांचे हे उदरनिर्वाहाचे साधन आहे. यांच्याकडे दर दिवसाला, आठवड्याला, महिन्याला यातून पैसे जात असतात. याच्यामुळे टोल बंद करायला तयार नाहीत. तुम्हाला चांगले रस्ते मिळणार नाहीत. फक्त याच लोकांचा फायदा होणार आहे. या लोकांनी थापा मारल्यानंतरही पुन्हा त्याच पक्षाला मतदान होतं हेच माझ्यासाठी अनाकलनीय असतं," असे राज ठाकरे म्हणाले.
"हे धाधांद खोटं आहे. हे पैसे जातात कुठे? खऱ्या अर्थाने टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे. याची शहानिशा झाली पाहिजे. मी मुख्यमंत्र्यांना भेटणार असून त्यांच्याकडून काय उत्तर येतं ते बघू. अन्यथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे चारचाकी, तीन चाकी आणि दुचाकीला टोल नसेल तर आमची माणसं प्रत्येक टोलनाक्यावर उभी राहतील. या वाहनांना टोल लावू दिला जाणार नाही. याला विरोध करायचा प्रयत्न केला तर टोलनाके जाळून टाकू," असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
"देवेंद्र फडणवीस काल म्हणाले की राज्यात दुचाकी, तीन चाकी आणि किंवा चारचाकी वाहनांना टोल माफ आहेत. मग आजपर्यंत टोलच्या नावाखाली जमा होणारी रक्कम कुठे जमा होत आहे? एकतर राज्य सरकार खोटं बोलत आहेत किंवा टोल कंपन्या लूट करत आहेत. मी लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे. आणि त्यांना सांगणार आहे की देवेंद्र फडणवीस म्हणालेत तसं दुचाकी तीन चाकी आणि चारचाकी वाहनांना टोल माफ करा, आणि इतके दिवस जे पैसे गोळा झालेत तर ते कुठे गेले? आणि इतकं होऊन पण जर टोल वसूल केला जाणार असेल तर माझे महाराष्ट्र सैनिक टोल नाक्यांवर उभे राहून वाहनांना सोडायला लावेल. आणि तरीही जर संघर्ष झाला तर आम्ही टोलनाके जाळून टाकू. मग जे होईल ते होईल," असेही राज ठाकरे म्हणाले.