मुंबई : मुंबईच्या राजकारणामध्ये शिवसेनेनं दिवाळीआधी बॉम्ब फोडला आहे. मनसेच्या मुंबईतल्या सातपैकी सहा नगरसेवक शिवसेनेनं फोडले आहेत. मनसेच्या या सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्याचं पत्र विभागीय कार्यालयला दिलं आहे. मनसेचे हे सहा नगरसेवक थोड्याच वेळात मातोश्रीवर दाखल होऊन शिवसेनेत प्रवेश करणार आहेत, अशी माहिती शिवसेना आमदार अनिल परब यांनी दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई महापालिकेत सध्या शिवसेनेची सत्ता असली तरी शिवसेना आणि भाजप यांच्या संख्याबळात केवळ एकच जागेचा फरक होता. भांडूपमधील पोटनिवडणुकीत काल भाजपची नगरसेविका विजयी झाल्यानं भाजपचं संख्याबळ ८३ वर पोहोचले तर सत्ताधारी शिवसेनेचे ८४ नगरसेवक आहेत.


‘आमच्या नगरसेवकांना कशाचं प्रलोभन दिलंय हे तपासावं लागेल. तसेच त्यांना धमक्या दिल्या का? तेही बघावं लागेल. याप्रकरणी आमच्या नेत्यांनी कायदेशीर तक्रार केली आहे. हे सर्व नगरसेवक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इंजिनावर निवडून आले आहे. अशाप्रकारे पक्ष सोडून जाणे दुर्दैवी आहे. त्यांना जायचं होतंच तर पक्षाचा, पदाचा राजीनामा द्यायचा होता. निवडणूक लढायची होती’, अशी प्रतिक्रिया मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.


'झी 24 तास'शी बाळा नांदगांवकर हे दूरध्वनीवरून बोलत होते, मात्र बाळा नांदगावकर बोलण्याच्या ओघात बोलून गेले, 'एवढ्या मोठ्या पक्षाला आमची मदत घ्यावीच लागली ना' आणि या एकाच वाक्यावरून, हा मनसेचा मास्टर स्ट्रोक असल्याचं दिसून येत आहे.


शिवसेनेकडून नगरसेवक खरेदीचा प्रयत्न सुरू असल्याचं पत्रच भाजप नेते खासदार किरीट सोमय्या यांनी निवडणूक आयोगाला आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिले आहे.


मनसेचे हे नगरसेवक शिवसेनेत


अर्चना भालेराव – वॉर्ड क्रमांक १२६


परमेश्वर कदम – वॉर्ड क्रमांक १३३


अश्विनी माटेकर- वॉर्ड क्रमांक १५६


दिलीप लांडे – वॉर्ड क्रमांक १६३


हर्षला मोरे – वॉर्ड क्रमांक १८९


दत्तात्रय नरवणकर- वॉर्ड क्रमांक १९७