`आता राज ठाकरेंची माफी मागणार का?`, मनसेचा संजय राऊतांना बोचरा सवाल
मनसेने पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई : मनसेने पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे. राज्य सरकारने दारूची दुकानं सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे आता संजय राऊत राज ठाकरेंची माफी मागणार का? असा बोचरा सवाल मनसेने विचारला आहे.
'राज ठाकरे यांनी मागच्या आठवड्यात वाइन शॉप सुरू करा, अशी मागणी केली होती. तेव्हा एका रडत राऊतांनी संपादकीय लिहल होत.आज वाइन शॉप राज्य सरकारने सुरू केले आहेत. त्यामुळे रडत राऊतांना एक प्रश्न, आता राज्य सरकार वर लेख लिहणार? की संपादकीय मागे घेऊन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची माफी मागणार? रडत राऊत उत्तर द्या' अशी टीका मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केली आहे.
राज्य चालवण्यासाठी महसुलाची गरज आहे, त्यामुळे मद्यविक्रीला परवानगी द्यायचा विचार करावा, अशी मागणी राज ठाकरेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली होती. या मागणीवरून संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखामधून राज ठाकरेंना चिमटे काढले होते.
राज ठाकरे यांनी दीनदुबळ्यांचे, शोषितांचे, कोरडवाहूंचे दुःख सरकारसमोर मांडले. त्यांना याकामी दुवा देणारा एक वर्ग नक्कीच असेल. बाकी सर्व भार सरकारवर. लॉकडाऊनच्या काळात लोकांना चिकन, मटण, भाजी, धान्य, दूध, पाणी मिळत आहे पण खरी आणीबाणी पिणाऱ्यांची झाली आहे. राज्यातील लाखो-कोटी मद्यप्रेमींच्या भावनाची खदखद व्यक्त करून राज महोदयांनी मोठेच उपकार केले आहेत. अशा शब्दात सामनातून टीका करण्यात आली होती.