Mumbai News : मुदत संपली, किती मराठी पाट्या लागल्या? मनसेचा `खळखट्ट्याक` इशारा!
Mumbai News : मुंबईतील दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्याची मुदत आज संपतेय. मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांवर मुंबई महापालिका (BMC) दंडात्मक कारवाई करणारा आहे. तर मनसेनं (MNS) पुन्हा एकदा खळखट्ट्याकचा इशारा दिलाय.
Marathi Patya in Mumbai : सर्वोच्च न्यायालयाच्या (SC) निर्देशानुसार मुंबई महानगरपालिका (BMC) कार्यक्षेत्रातील दुकाने व आस्थापनांवर मराठी देवनागरी लिपित ठळक अक्षरात नामफलक लावणे बंधनकारक आहे. दुकानांवर मराठी पाट्या (Marathi Patya) लावण्यासाठी सुप्रीम कोर्टानं दिलेली मुदत शनिवारी संपली. वारंवार मुदत वाढवूनही मराठी पाट्या न लावणाऱ्या दुकानदारांविरोधात मनसेनं (MNS) आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठी पाट्यांबाबत कायदा पाळणार नसाल तर आम्ही कायदा हातात घेऊ, असा इशाराच मनसेनं दिलाय. त्यामुळं पुन्हा एकदा खळखट्ट्याक मोहीम सुरू होणार आहे.
दुकानांवर मराठी पाट्या लावण्यासाठी सुप्रीम कोर्टानं 25 नोव्हेंबरपर्यंतची मुदत दिली होती. मुंबईत सुमारे 7 लाख दुकानं आस्थापनं आहेत. त्यापैकी केवळ 28 हजार दुकानदारांनी मराठी पाट्या लावल्याची आकडेवारी मुंबई महापालिकेनं दिलीय. विशेष म्हणजे दुकानदारांना पाट्या लावण्यासाठी तब्बल तीनवेळा मुदतवाढ देण्यात आलीय. तरीही पाट्या न लावणा-या दुकानांवर मुंबई महापालिका सोमवारपासून दंडात्मक कारवाई सुरू करणार आहे. प्रति कर्मचारी 2 हजार रुपये या हिशेबानं दंडआकारणी केली जाणारेय.
मराठी पाट्या लावण्याच्या या निर्णयाविरोधात व्यापारी संघटनेनं कोर्टात धाव घेतली होती. मात्र सुप्रीम कोर्टानं व्यापाऱ्यांची विनंती फेटाळली. त्यामुळं आता नियमाचं उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर थेट दंडात्मक कारवाई होणार आहे. त्यासाठी मुंबईतील 24 विभागांसाठी 75 पालिका अधिकारी कर्मचऱ्यांची टीम तैनात करण्यात आलीये.
आणखी वाचा - 350 रुपयांसाठी तरुणाला 60 वेळा भोसकला चाकू; मृतदेहासमोर आरोपी नाचला, खळबळजनक Video समोर!
दरम्यान, मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यापक बैठक घेऊन माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आदेश सर्व संबंधितांना दिले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यांसदर्भात एक व्हिडिओही जारी केला आहे. तत्परतेने कारवाई होईल अशी अपेक्षा आहे अन्यथा आम्ही आहोतच, असं त्यांनी यात म्हटलं आहे. कायदा हातात घेतात म्हणून महाराष्ट्र सैनिकांना केसेस टाकून छळलंत पण कायदा धाब्यावर बसविणाऱ्या ह्या महाराष्ट्रद्वेष्ट्यांवर काय कारवाई होते ते आता आम्ही पाहणार आहोत, असं राज ठाकरे यांनी म्हटलं होतं.