मुंबई : यार्डात पोहोचलेल्या मनसेचे उरलेसुरले डबे अशी ओळख असलेल्या ते नगरसेवक अखेर शिवसेनेच्या भगव्याखाली विसावले. हे नगरसेवक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधनातही अडकले. पण, त्यांच्यासमोर उपस्थित झाला कायदेशिर पेच. आता या पेचावर १४ नोव्हेंबरला फैसला होणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनसेतून शिवसेनेत पोहोचलेल्या या सहा नगरसेवकांची येत्या १४ नोव्हेंबरला कोकण विभागीय आयुक्तांसमोर सुनावनी होणार आहे. मनसेच्या तक्रारीची दखल घेऊन ही सुनावणी ठेवण्यात आली आहे. या नगरसेवकांची कोंडी करण्यासाठी मनसेने पुढाकार घेत कोकण विभागीय आयुक्तांशी पत्र व्यवहार केला. पक्षांतर केलेल्या नगरसेवकांना पालिकेतील कोणत्याही समित्यांच्या बैठकांमध्ये प्रवेश देऊ नये, प्रस्तावावर मतदान करण्यापासून बंदी घालावी, त्यांचे पालिकेतील सदस्यत्व रद्द करावे, अशी मागणी मनसेनं पत्राद्वारे केली आहे.


मनसेतील सात पैकी सहा नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश करून मनसेसह  भाजपलाही जोरदार राजकीय धक्का दिलाय. मात्र आता या सर्वांचे भवितव्य कोकण आयुक्तांच्या निर्णयावर अवलंबून असून निर्णयबाबत शिवसेनेतही आता अस्वस्थता पसरलीय.