रेल्वे स्थानकावर मोबाईल चार्ज करणं झालं सोपं
१५ स्थानकांवर सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट उभारण्यात आले आहेत.
मुंबई : मोबाईल फोन आता काळाची गरज झाली आहे असं म्हणणं वावगं ठरणार नाही. कारण सध्याच्या फास्ट जगात मोबाईल शिवाय जगण फार कठिण झालं. त्यासाठी प्रथम मोबाईल जिवंत राहिला पाहिजे. कित्येक वेळा ऐनवेळी मोबाईलमधील चार्जिंग संपते आणि मोबाईल 'डेड' होतो. मोबाईलची चार्जिंग संपल्यामुळे समोरच्या व्यक्तीसोबत संवाद साधणं फार कठीण होतं.
यावर पश्चिम रेल्वे प्रशासनाने फार उपयुक्त असा तोडगा काढला आहे. पश्चिम रेल्वेमार्गावर पर्यावरणपूरक यंत्रणा (solar energy mobile charging service on western railway) आणण्यावर भर दिला जात आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून प्रवाशांना त्यांचे फोन चार्ज करणं सोपं होणार आहे.
पश्चिम रेल्वेमार्गावरील १५ स्थानकांवर सौरऊर्जेवर चालणारे मोबाइल चार्जिंग पॉइंट उभारण्यात आले आहेत. या सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोबाइल चार्जिंग पॉइंटमध्ये एका वेळी ८ फोन चार्जिंग करता येणार आहे. तर, एका दिवसात १०० पेक्षा जास्त फोन चार्ज होऊ शकतात.
पश्चिम रेल्वेमार्गावरील चर्चगेट, ग्रॅण्ट रोड, मुंबई सेंट्रल, लोअर परळ, दादर, सांताक्रुझ, अंधेरी, कांदिवली, वसई रोड, नालासोपारा, विरार, बोईसर, पालघर येथे प्रत्येकी एक मशीन बसविण्यात आली आहे. तर बोरीवली येथे दोन मशीन बसवण्यात आल्या आहेत.
यासंदर्भात माहिती खुद्द पश्चिमरेल्वे प्रशासनाने ट्विटरच्या माध्यमातून दिली. त्यामुळे आता मोबाईलमधील चार्जिंग संपली तरी पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना सौरऊर्जेवर चालणाऱ्या मोबाइल चार्जिंग पॉइंटच्या माध्यमातून फोन चार्जिंग करता येणार आहे.