मातोश्रीबाहेर मोहित कंबोज रेकी करत होते? मोहित कंबोज यांची पहिली प्रतिक्रिया
मोहित कंबोज यांच्या गाडीवर मातोश्रीजवळ शिवसैनिकांचा हल्ला
मुंबई : राणा दाम्पत्यानं 'मातोश्री'वर येण्याचा इशारा दिल्यानंतर शेकडो शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले आहेत. याचवेळी संध्याकाळी उशीरा मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांची गाडी मातोश्रीबाहेरुन जात असताना शिवसैनिकांनी मोहित कंबोज यांच्या गाडीवार हल्ला केल्याचा आरोप कंबोज यांनी केला आहे.
मोहित कंबोज यांची पहिली प्रतिक्रिया
उत्तर भारतीय संघात एक विवाह सोहळा होता, तिथून निघून मी घरी परतत होतो, कला नगर जंक्शनजवळ सिग्लला गाडी जेव्हा थांबली, त्यावेळी शंभर दोनशे शिवसैनिकांचा जमाव गाडी जवळ आला. त्यांनी सरळ माझ्या गाडीवर हल्ला केला.
मला काही कळण्याच्या आत तिथे पोलीस आले, पण शिवसैनिकांनी माझ्या गाडीच्या काचा फोडल्या, हँडल तोडलं, गाडीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. काही लोकांनी गाडीत घुसण्याचा प्रयत्न केला. मुंबई पोलिसांनी तात्काळ तिथे धाव घेत जमावाला हटवण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी सिग्नव सुटला आणि माझ्या ड्रायव्हरने तिथून गाडी बाहेर काढली.
मुंबईत अशा प्रकारची घटना रस्त्यावर होत असेल, तर मला वाटतं मुंबईची कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या घटनेचा मी निषेध करतो, असं कंबोज यांनी म्हटलं आहे.
विरोधी पक्षातील लोक सरकारचा भ्रष्टाचार बाहेर काढत असतील त्यांच्यावर असा रस्त्यावर हल्ला होत असेल, तर अशी निंदनीय घटना महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशात झाली नसेल असं कंबोज यांनी म्हटलं आहे.
मंत्री अस्लम शेख, प्रसाद लाड, विखे पाटील हे माझ्याबरोबर हल्ल्याच्या दहा मिनिटापूर्वी होते, तिथून आम्ही एकत्र निघालो, काँग्रेस नेते भाई जगतापही तिथे होते. त्यामुळे रेकी करण्यासाठी गेल्याचा आरोप चुकीचा आहे. मी विवाह सोहळ्याला गेलो होतो तिथून निघून मी घरी जात होतो, तो एकच रस्ता आहे जिथून मी घरी जातो. माझ्याकडे हेलिकॉप्टर नाही की मी उडून घरी जाऊ.
माझ्या गाडीवर झालेल्या घटनेचा मी निषेध करतो. या घटनेची चौकसी करुन जे यात आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी कंबोज यांनी केली आहे.