Monsoon Update: मुंबई आणि दिल्लीत 1961 नंतर पहिल्यांदाच असं घडलंय; तब्बल 62 वर्षांनी जुळून आला योगायोग
Monsoon Update: हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीत रविवारी 25 जूनला एकाच वेळी पाऊस दाखल झाला आहे. साधारणपणे मुंबईत दिल्लीच्या 15 दिवस आधी पाऊस दाखल होतो. मुंबईत एकीकडे पाऊस दोन आठवडे उशिरा दाखल झालेला असताना, दिल्लीत मात्र 5 दिवस आधीच कोसळला आहे.
Monsoon Update: गेल्या अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस अखेर दाखल झाला आहे. उत्तर भारतात पावसाने जोर पकडला आहे. अनेक राज्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून, काही राज्यांनी एक ते दोन दिवस वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, मुंबई आणि दिल्लीकरांची पावसाची प्रतिक्षा अखेर संपली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई आणि दिल्लीत एकाचवेळी 25 जून रोजी पाऊस दाखल झाला आहे.
साधारणपणे मुंबईत दिल्लीच्या 15 दिवस आधी पाऊस दाखल होतो. मुंबईत 10 ते 15 जूनदरम्यान पाऊस होत असतो. तर दिल्लीत सामान्यपणे 30 जूनला पाऊस हजेरी लावतो. अशा स्थितीत एकीकडे पाऊस मुंबईत दोन आठवडे उशिरा दाखल झालेला असताना, दिल्लीत मात्र 5 दिवस आधीच कोसळला आहे.
21 जून 1961 नंतर पहिल्यांदाच असं झालं आहे की, दिल्ली आणि मुंबईत एकाच दिवशी पावसाने हजेरी लावली आहे. 1961 मध्ये एकाचवेळी पावसाने संपूर्ण देशभरात हजेरी लावली होती. त्यानंतर तब्बल 62 वर्षांनी हा योगायोग जुळून आला आहे.
दिल्लीत वेळेच्या आधी पाऊस दाखल
हवामानात झालेल्या बदलांमुळे पूर्व आणि मध्य भारतात मॉन्सूनमध्ये काही वेगवान घडामोडी घडत आहेत. देशातील पूर्व भागातील नव्या घडामोडींमुळे दिल्लीत मॉन्सून वेळेच्या आधी दाखल झाला आहे. जून संपता संपता संपूर्ण भारतात मॉन्सून पोहोचेल. दिल्लीत साधारणपणे 30 जूनपर्यंत मॉन्सूनचा प्रवेश होतो.
मुंबईत ऑरेंज अलर्ट
मुंबईला पहिल्याच पावसाने चांगलचे झोडपून काढलं. शनिवारी मुंबईत 115.8 मिलीमिटर पावसाची नोंद झाली. शनिवारी सकाळपासूनच पावसाने मुंबईत हजेरी लावली. दरम्यान मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुढच्या 48 तासांत मुंबईत पाऊस आणखी सक्रीय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोणीही समुद्र किनारी जाऊ नये, असं आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, पहिल्याच पावसात मुंबईतल्या मान्सूनपूर्व तयारीचा यंत्रणांचा दावा मात्र फोल ठरला. किंग्स सर्कल, अंधेरी सबवेजवळ सखल भागात पाणी साचले. तर वाहतुकीलाही पाणी साचल्यानं मोठा फटका बसला.
दिल्ली-एनसीआरमधील या ठिकाणी पावसाचा अंदाज
हवामान विभागानुसार यमुनानगर, करनाल, पानिपत, आदमपूर, हिस्सार, गोहाना, गन्नौर, सिवानी, सोनपत, रोहतक, भिवानी आणि लगतच्या भागात पुढील काही तासांत हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, दादरी, झज्जर, महेंद्रगड, सोहाना, रेवाडी, पलवल, बावल, नूह, औरंगाबाद, होडल, सहारनपूर, देवबंद, नजीबाबाद, शामली, मुझफ्फरनगर, कांधला, बिजनौर, चंदपूर, बरौत, दौराला, खतौली, हस्तिनापूर, मेपत, बाग. मोदीनगर, किथोरे, मुरादाबाद, गढमुक्तेश्वर, रामपूर, पिलखुआ, हापूर, सिकंदराबाद, बुलंदशहर, जहांगीराबाद, शिकारपूर, खुर्जा, जट्टारी, अत्रौली, अलवरसह अनेक शहरांमध्ये आज (रविवार), 25 जूनला पाऊस पडेल असा अंदाज आहे.