मुंबई : मान्सून पूर्व पावसाने मुंबईत जोरदार हजेरी लावली. रात्री आठ वाजल्यानंतर पावसाला सुरूवात झाली. मुंबई शहरासह उपनगरांत चांगला पाऊस झाला. भांडुप, घाटकोपर, विक्रोळीत विजांच्या कडकडाटासह पाऊस झाला. पावसामुळे मुंबईच्या सखल भागात पाणी साठलं होतं. रस्त्यावर पाणी साठल्यामुळे वाहतूक मंदावली होती... अनेक ठिकाणी गुडघाभर पाणी साठलं होतं... पहिल्याच पावसाने मुंबईची त्रेधातिरपीट उडवली. तरी मुंबईकरांमध्ये मात्र तक्रारीचा सूर नव्हता. उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना पावसाच्या थंडगार वातावरणात आल्हाददायक अनुभव मिळाला. चेंबूर नाका इथे मोठा वृक्ष कोसळल्यामुळे सायनकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती. समोर अग्निशमन दल असून सुद्धा अग्निशमन दल पोहचले नाही. मुंबईबाहेर ठाणे जिल्ह्यातही जोरदार पाऊस झाला. कल्याणमध्ये विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. तर डोंबिवली, बदलापूरमध्येही जोरदार पाऊस झाला... विजांच्या कडकडाटात झालेल्या पावसामुळे अनेक भागात पाणी साचलं... 


माटुंग्यात पाणी साचले


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माटुंग्याच्या गांधी मार्केटसमोर पाणी तुंबल्यामुळे वाहन चालकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. मान्सूनपूर्व सरींनीच मुंबई महापालिकेचा कारभार जगासमोर उघड केला. अवघ्या तासाभराच्या पावसाने अनेक भागात पाणी तुंबलं आणि मुंबईचं ट्रॅफीक रखडलं. 



 


मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपरमध्ये जनजीवन विस्कळीत


काल दिवसभर पावसाने विश्रांती घेत आज पुन्हा संध्याकाळी मुंबई उपनगरात जोरदार एंट्री केली. सोसाटय़ाच्या वाऱ्यासह मुसळधार पावसाने मुंबई उपनगरात मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर परिसरात जनजीवन विस्कळीत झाले होते तर काही ठिकाणी सखल भागात पाणीदेखील साचले. एलबीएस मार्गावरील वाहतूक देखील काही काळ मंदावली होती . 


उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांवर पावसाचा शिडकावा


उकाड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना थोडा थंडावा मिळाला. सुट्टीचे काही दिवसच शिल्लक असताना आलेल्या पावसात मज्जा करण्यासाठी मुंबईकर बच्चे कंपनी रस्त्यावर मैदानात जिथे मिळेल तिथे खेळत होती. अनेकांनी फुटबॉल खेळून पावसाचा आनंद लुटला. मान्सूनपूर्व पाऊस असला तरी त्यात भिजण्याचा आनंद बच्चे कंपनीने अनुभवला.