मुंबई : राज्य मंत्रीमंडळाने राज्यातील सर्व दुकानांवर आता मराठीत ठळक अक्षरात नावं दुकानांची नावं लिहिण्याचे आदेश जारी केले आहेत. मात्र या आदेशांना मुंबई ट्रेडर्स संघटनेचे अध्यक्ष विरेश शहा यांनी विरोध करत आदेशांचं पालन करणार नसल्याचं म्हटलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना उतरली रस्त्यावर


त्यामुळे शिवसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून मराठी पाट्यांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. शिवसैनिकांनी विरेन शहा यांच्या मालकीच्या रुपम शॉप समोरच मोठे बॅनर लावले आहेत. बॅनरवर 'महाराष्ट्रातील प्रत्येक दुकानाची पाटी आता मराठीतच, दहा कामगारांपेक्षा कमी असलेल्या आस्थापनांना सुद्धा मराठी पाट्या लावणे बंधनकारक, हे आपलेच ठाकरे सरकार' असं लिहिण्यात आलं आहे.


मुंबई पोलीस मुख्यालयासमोरच विरेश शहा यांच्या मालकीचं रुपम शॉप आहे. त्या शॉपच्या शेजारीच शिवसेनेने हे बॅनर लावले आहेत. त्यामुळे येत्या काळात मराठी पाट्यांवरून व्यापारी आणि शिवसैनिकांमध्ये संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. 


संजय राऊत यांनी दिला हा इशारा
या निर्णयाला व्यापारी वर्गाने विरोध दर्शविला आहे. यावर संजय राऊत यांनी कुणी विरोध केला तर त्यांना सरळ करु असं म्हटलं आहे. “विरोध करतो म्हणजे का. तामिळनाडू, बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, पंजाब, महाराष्ट्र किंवा मग कर्नाटक प्रत्येक राज्याला अधिकार आहे, त्या भाषेचा अधिकार आहे. विरोध कसला करत आहात… तुम्हाला मुंबईत राहायचं आहे, महाराष्ट्रात राहायचं आहे हे विसरु नका. तुम्हाला येथे राहायचं आहे, व्यापार करायचा आहे. हे काही व्यक्तिगत किंवा राजकीय भांडण नाही कोणाचं. करणार नाही म्हणजे काय?”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी सुनावलं.