मुंबईत ८ तर ठाण्यात १ गोविंदा जखमी
मुंबईसह ठाण्यामध्ये उंचच उंच हंडीचा थरार पाहायला मिळतोय.
मुंबई : गोविंदाचा उत्साह आज राज्यभरात पाहायला मिळतोय. मुंबईसह ठाण्यामध्ये उंचच उंच हंडीचा थरार पाहायला मिळतोय. या सणाला गोविंदाच्या जखमी होण्यानं गालबोट लागलंय. मुंबईत ८ गोविंदा जखमी झाल्याचे वृत्त आहे. केईएम, जे.जे, एम.टी अग्रवाल अशा रुग्णालयांमध्ये या जखमी गोविंदांवर उपचार सुरू आहेत.
राज्यभरात उत्साह
श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्सव राज्यभरात पाहायला मिळतोय. इस्कॉनच्या मंदिरांत तर कृष्ण जन्मोत्सवाची विशेष शोभा पाहायला मिळाली. मुंबईतल्या इस्कॉन मंदिरात जन्माष्टमी निमित्तानं श्रीकृष्णाला सजवण्यात आलं होतं. सोबतच भजन किर्तनही रंगलं होतं. कृष्ण जन्म सोहळ्यात दूधाचा अभिषेक आणि भजन कीर्तन करण्यात आलं.
बाल कन्हैयाचं गुणगान
शिर्डी साईबाबा मंदीरातही कृष्ण जन्मोत्सव मोठया श्रध्देने आणि उत्साहात साजरा करण्यात येतो. साईबाबांच्या मंदीरात चांदीच्या पाळण्यात श्रीकृष्णाची मुर्ती ठेवुन बाल कन्हैयाचं गुणगान करण्यात आलं. कृष्णजन्माष्टमीच्या निमित्तानं साईमंदीरात किर्तन पार पडल्यावर रात्री 12 वाजता कृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला.
नागपूरात शोभायात्रा
नागपुरात श्रीकृष्ण जन्मोत्सव पर्वानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. श्रीकृष्ण जन्मोत्सव शोभायात्रा समितीच्या पुढाकाराने धंतोलीतील गोरक्षण सभेच्या प्रांगणापासून या शोभायात्रेला सुरुवात झाली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी श्रीकृष्ण पूजनेनंतर या शोभायात्रेला प्रारंभ झाला. शोभायात्रेत विविध पौराणिक देखावे सादर करण्यात आले होते.शोभायात्रेत मोठ्या संख्येने भक्तही सहभागी झाले होते.