होम क्वारंटाइनचा आदेश तो़डून `तो` फिरत होता, पोलिसांनी पकडलं आणि...
मुंबईतही एका कोरोना पॉझिटीव्ह इसमाने क्वारंटाईन असताना पळून जाण्याचा प्रयत्न केला.
मुंबई : भारतात जवळपास २५० लोकांना कोरोनाची लागण झाली असून या महामारीला रोखण्यासाठी भारतातील अनेक शहरांमध्ये मॉल, सिनेमागृह आणि गर्दीची ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत. अनेक शहरं पुढील काही दिवस बंद राहणार आहेत. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी देशाला संबोधित करत २२ मार्चला जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलं आहे. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. पण काहीजण यातून फरार होत असल्याचे गंभीर प्रकार वारंवार समोर येत आहेत. मुंबईतही एका कोरोना पॉझिटीव्ह इसमाने क्वारंटाईन असताना पळून जाण्याचा प्रयत्न केला.
हा इसम दुबईतून मुंबईत आला होता. तो कोरोना पॉझिटीव्ह असल्याने त्याला होम क्वारंटाईन करण्यात आले होते. पण हा आदेश तोडत त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. धारावीतील रस्त्यांवर तो फिरत होता. मुंबई पोलिसांनी त्याचा हा प्रयत्न हाणून पाडला आणि त्याला सरकारी होम क्वारंटाईन रुग्णालयात दाखल केले. चार दिवसांपुर्वी हा इसम मुंबईत आला होता. ४३ वर्षांच्या इसमाला सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
क्वारंटाईन केलेलं कुटुंब फरार
नाशिकच्या इगतपुरीमध्ये होम क्वारंटाईन केलेले कुटुंब फरार झाले आहे. ही माहिती समोर आल्यानंतर मोठी खळबळ उडाली. इगतपूरी येथे राहणाऱ्या या कुटुंबातील चार जण काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियातून परतले होते. यावेळी त्यांची विमानतळावर तपासणी झाली होती. यानंतर त्यांना होम क्वारंटाईनमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, आज वैद्यकीय पथक त्यांची तपासणी करायला गेल्यानंतर हे कुटुंब घरातच नसल्याचे निदर्शनास आले. यावेळी आजुबाजूला चौकशी केली असता काहीजणांनी हे कुटुंब फिरायला गेल्याची माहिती दिली. त्यामुळे कोरोनाच्या धोक्याविषयी वारंवार सूचना देऊनही नागरिक ऐकायला तयारी नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. दरम्यान, नाशिक पोलिसांनी सध्या या कुटुंबाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
दुसऱ्या टप्प्यात
कोरोना व्हायरसवर अजून कोणतीही लस मिळालेली नाही. जगभरातील देश यावर लस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सध्या तरी या व्हायरसच्या संपर्कात येवू नये इतकंच करता येवू शकतं. भारतात कोरोना सध्या दुसऱ्या टप्प्यात आहे. दुसऱ्या टप्प्यातच याचा नाश करण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. कारण तिसऱ्या टप्प्यात हा पोहोचला तर याला थांबवणं कठीण होणार आहे.