IPS officer Deven Bharti : महाराष्ट्र गृहविभागाने (Maharashtra Home Department) बुधवारी 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी देवेन भारती यांच्याकडे नवीन जबाबदारी सोपवली आहे. देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्तपदी नियुक्ती (Mumbai Special Commissioner of Police) करण्यात आली आहे. देवेन भारती यांची नियुक्ती करण्यासाठी विशेष आयुक्त पदाची निर्मीती करण्यात आली आहे. राज्य सरकारने मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) विशेष आयुक्तपदाची निर्मिती करण्याची ही पहिलीच वेळ आहे. यापूर्वी मुंबई पोलिसांत हे पद नव्हते. देवेन भारती हे याआधी मुंबईचे सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था), पोलिस सहआयुक्त, आर्थिक आणि गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून काम केले आहे. याशिवाय त्यांनी महाराष्ट्र एटीएसचेही नेतृत्व केले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काय आहे विशेष पोलीस आयुक्त पद?


दिल्ली पोलिसांच्या धर्तीवर मुंबईतही अशा प्रकारचा प्रयोग करण्यात आला आहे. आतापर्यंत महासंचालक पदाच्या अधिकाऱ्यांची पोलीस आयुक्त पदासाठी नेमणूक केली जायची. आता सरकारने या नव्या पदाची निर्मिती केली असून त्याजागी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या अंतर्गतच देवेन भारती काम पाहणार आहेत. देवेन भारती यांच्याकडे गुन्हे आणि आर्थिक गुन्हे शाखा यांची जबाबदारी असणार आहे. मात्र त्यांना पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनाच अहवाल द्यावा लागणार आहे. महाविकास आघाडी सरकार जाताच नव्या सरकारने या पदाची निर्मिती केली आहे.



देवेन भारती यांची कारकिर्द


महाविकास आघाडी सरकारच्या काळात देवेन भारती यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. सत्तातरानंतर शिंदे - फडणवीस सरकारने 13 डिसेंबर रोजी भारती यांना या पदावरून हटवून आणि त्यांच्या जागी सह आयुक्त (वाहतूक) राज्यवर्धन यांची महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली होती. देवेन भारती हे आधीच्या फडणवीस सरकारमधील मुंबईतील सर्वात महत्त्वाचे असे अधिकारी मानले जात होते. त्याच दरम्यान त्यांना सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) म्हणून पदोन्नती देण्यात आली होती. त्यानंतर त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देऊन दहशतवाद विरोधी पथकात (एटीएस) बदली करण्यात आली होती.


दुसरीकडे या पदामुळे पोलीस दलाच्या कामकाजावर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम होईल, असे मत काही वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी व्यक्त केले आहे. "मुंबई हे एक आयुक्तालय आहे आणि त्याच्या अध्यक्षपदी एकच व्यक्ती असावी. नवीन पदाच्या अभूतपूर्व निर्मितीमुळे सत्तेची दुहेरी केंद्रे होतील आणि हे कोणत्याही परिस्थितीत टाळले पाहिजे," एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.


दरम्यान याआधी मंगळवारी, माध्यमांच्या एका विभागात राज्य सरकार वरिष्ठ पोलीस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्याचा विचार करत असल्याच्या वृत्त समोर आले होते.