मुंबईवर आधीच वायुप्रदूषणाचे संकट, त्यात ट्विन टनलसाठी बोरीवली नॅशनल पार्कमधील `इतकी` झाडे कापणार
Thane-Borivali Twin Tunnel: संजय गांधी नॅशनल पार्कचे मुख्य क्षेत्र आणि पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रातील 122 झाडे कापली जाणार आहेत.
Borivali National Park Trees Cut: बोरिवलीला ठाण्याशी जोडण्यासाठी ट्विन टनल बनवला जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ड्रिम प्रोजेक्ट लवकरच पूर्णत्वास येणार आहे. हा मार्ग मुंबईचं फुफुस मानलं जाणाऱ्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पोटातून जातो. दरम्यान संजय गांधी नॅशनल पार्कचे मुख्य क्षेत्र आणि पर्यावरण-संवेदनशील क्षेत्रातील 122 झाडे कापली जाणार आहेत. आधीच मुंबईत वायु प्रदुषण वाढले आहे. शहरात वेगाने कंस्ट्रक्शन सुरु असून अनेक ठिकाणी झाडांची कत्तल केली जात आहे. त्यात आता 122 झाडे कापली जाणार असल्याने पर्यावरणप्रेमींमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
मुंबई मेट्रोपोलिटन क्षेत्र विकास प्राधिकरण म्हणजेच एमएमआरडीएला राज्य वन्यजीव बोर्डाने यासाठी परवानगी दिली आहे. यासाठी 27 मोठ्या खड्ड्यांची गरज असून त्यासाठी विस्फोटकांचा वापर करुन जमिन खोदली जाणार आहे.
मुंबईतील हवेचा दर्जा निर्देशांक 163 वर नोंदवला गेला आहे. विषारी हवेमुळे लोकांना श्वास घेणे कठीण होत आहे. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावरही परिणाम होत आहे. हवेतील प्रदूषणाच्या वाढत्या पातळीमुळे, मोठ्या संख्येने लोकांना दमा आणि सीओपीडी सारख्या फुफ्फुसाच्या आजारांना सामोरे जावे लागत आहे. रुग्णालये आणि डॉक्टरांच्या दवाखान्यातही रुग्णांची गर्दी सातत्याने वाढत आहे. मुंबईतील झाडांचे कमी होत चाललेले प्रमाण, वाहतूक, वाढते बांधकाम ही प्रदूषणामागची कारणे आहेत. पर्यावरणतज्ज्ञांच्या मते महानगरात सुरू असलेल्या बांधकामांमुळे प्रदूषणाची पातळीही वाढत आहे. खरं तर इथे सतत होत असलेल्या कामांमुळे धूळ-मातीचे प्रमाण वाढले आहे. कंस्ट्रक्शन साइटवर पाण्याचा वापर कमी केला जातोय. यामुळे धूळ-माती पर्यावरणात मिसळत आहे.
मुंबईतील खालावत चाललेल्या हवेबाबत महापालिकाही अत्यंत गंभीर आहे. धूळ कमी करण्यासाठी महापालिका मुंबईत ठिकठिकाणी अँटी स्मॉग गन आणि वॉटर स्प्रिंकलर वापरत आहे. यासंदर्भात बीएमसीकडून मार्गदर्शक तत्त्वेही जारी करण्यात आली आहेत. बीएमसीच्या म्हणण्यानुसार, बांधकामाच्या ठिकाणी 35 फूट उंच लोखंडी पत्र्याचे कुंपण देखील अनिवार्य करण्यात आले आहेत. एक एकरपेक्षा कमी क्षेत्रफळ असलेल्या बांधकामाच्या जागेसाठी लोखंडी पत्र्याचे कुंपण 25 फूट उंच असेल. बांधकाम सुरू असलेल्या इमारतीला हिरवे कापड/ज्युट शीट/टारपॉलीन वेढले जाईल. बांधकामाचा भंगार वाहून नेणारी सर्व वाहतूक वाहने ताडपत्रीने व्यवस्थित झाकलेली असावीत. अशा कोणत्याही वाहनाला विहित वजनापेक्षा जास्त वजन वाहून नेण्याची परवानगी नाही. तसेच अशा सर्व वाहनांचे टायर बांधकामाच्या ठिकाणी सोडण्यापूर्वी आणि रस्त्यावरून जाण्यापूर्वी धूळ काढण्यासाठी अनिवार्यपणे साफ करणे आवश्यक आहे. त्यांच्यावर पाणी शिंपडले जाईल.