Mumbai Air Quality :  देशसह राज्यात थंडी लाट (Weather Update ) पसरली असली तरी मुंबईकरांना अजून गुलाबी थंडीसाठी वाट पाहावी लागणार आहे. त्यामुळे मुंबईकरांची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. मुंबईत दिवसेंदिवस धुलिकणांचं प्रमाण वाढताना दिसत असून हवेची गुणवत्ता आणखीन खालावलीय. मुंबईतील देवनारची हवा अतिवाईट असून सायन, मालाड, बांद्रा-कुर्ला कॉम्पलेक्समधील हवाही वाईट असल्याची नोंद झाली आहे. दरम्यान मुंबईसोबतच नवी मुंबईच्या हवेची देखील गुणवत्ता खालावत असल्याचं समोर आलं आहे. (mumbai air pollution quality weather update mumbai air quality index marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबईत शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण पाहिला मिळालं तर मुंबईभर धुरक्याचं साम्राज्य पसरलं होतं. केंद्र सरकारच्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या माध्यमातून सफर या हवामान प्रदूषण मापन प्रणालीनुसार शुक्रवारी मुंबईच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक 188 एवढी असल्याचं सांगण्यात आलं.  तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार हा निर्देशांक 189 एवढा होता अशी माहिती दिली आहे. शनिवारीदेखील मुंबईतील वातावरण ढगाळ राहणार असून रविवारी आभाळ निरभ्र राहिल, असा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे. रविवारनंतर तीन दिवस किमान तापमानत घट पाहिला मिळेल, अशी शक्यताही वर्तविण्यात आली आहे. शुक्रवारी मुंबईमध्ये सांताक्रूझमध्ये 32.3 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 


मुंबईत कृत्रिम पाऊस


मुंबईत प्रदूषणास कारणीभूत धुळीचे कण हवेत पसरु नये यासाठी कृत्रिम पावसाचा (BMC ARTIFICIAL RAIN)  प्रयोग केला जाणार असल्याचं मुंबई महापालिकेकडून सांगण्यात आले आहेत. यासाठी महापालिकेला सहा कंपन्यांनी तयारी दर्शवली असून त्यांनी निवेदन पाठवलं आहे. आता मुंबईत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे.


हेसुद्धा वाचा - Weather Update : काश्मीरमध्ये नद्या-नाले गोठण्यास सुरुवात, राज्यात पारा 10 अंशांच्या खाली; मुंबईत ढगाळ वातावरण


मुंबईकरांना आरोग्याची काळजी घ्या!


वाढत्या प्रदूषणामुळे मुंबईतील हवेची गुणवत्ता बिघडली असून मुंबईकरांच्या आरोग्यावर परिणाम होतो आहे. त्यामुळे राज्य सरकार आणि पालिकेकडून मार्गदर्शक नियमावली काढण्यात आली आहे. पण या नियमावलीकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं चित्र दिसत आहे. या नियमावलीनुसार मुंबईत शेकोटीवर बंदी घालण्यात आली आहे. तर पालिकेकडून प्रदूषणासंदर्भात कठोर पाऊलं उचलणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच त्यासाठी सुधारित नियमावली जाहीर करण्यात आली आहे.