Mumbai News : मुंबईत वाढणारी गर्दी, वाहनांची दर दिवशी वाढणारी संख्या, शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी सुरु असणारी बांधकामं या साऱ्या कारणांमुळं मागील काही दिवसांपासून शहरामध्ये प्रचंड प्रमाणात धुरकं दिसून आलं. ज्यामुळं दृश्यमानता कमी होत असून, अनेकांनाच श्वसनाचे विकारही सतावू लागले आहेत. मुंबईच्या काही भागांमध्ये सध्या हवेची गुणवत्ता सुधारली असली तरीही काही भागांमधील हवा वाईटच असल्याचा इशारा यंत्रणांनी दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सध्याच्या घडीला शहराच्या पश्चिम उपनगरांतील हवेच्या दर्जात सुधारणा झाली असली तरीही मुंबईतील महत्त्वाच्या भागामध्ये असणाऱ्या शीव, माझगाव, वरळी, बीकेसी आणि विमानतळ परिसरातील हवा मात्र वाईट असल्याचं वृत्त समोर आलं आहे. 


गेले अनेक दिवस मुंबई शहर तसेच उपनगरांतील हवेचा खालावलेला दर्जा सध्या काही अंशी सुधारताना दिसत आहे. पण, माझगाव, शीव, वरळी, बीकेसीतील हवेचा दर्दा मात्र दिवसेंदिवस मध्यम ते वाईट श्रेणीत झुकत असल्यामुळं ही बाब चिंता वाढवणारी ठरत आहे. सध्याच्या घडीला AQI 200 ते 300 च्या दरम्यान नोंदवला जात असल्यामुळं शहरातील हवेची पातळी नेमकी किती खालावली आहे हेच आता अधिक स्पष्टपणे समोर आल्यामुळं प्रशासकीय यंत्रणाही यावर तोडगा काढण्यासाठी तयारीला लागले आहेत. 


कारवाईनंतरही परिस्थिती जैसे थे... 


शहरातील हवेच्या गुणवत्तेचा स्तर पाहता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबई महापालिका यांच्यामार्फत पर्यावरण नियमांचे उल्लंघन केलेल्या अनेक बांधकाम, उद्योगांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्याचदरम्यान शहरात आलेल्या अवकाळी पावसामुळंही हवेतील धुरक्याचं प्रमाण कमी होऊन तुलनेनं हवेची गमवत्ता सुधारली होती. 


काही दिवसांतच वायू प्रदूषणाचं प्रमाण पुन्हा वाढलं. सध्या हवेत पीएम 10 ची मात्रा जास्त असून, हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार हवेतील धुलीकणांचं प्रमाण सातत्यानं वाढत आहे.


हेसुद्धा वाचा : Share Market Updates : शेअर बाजारात तेजीचे संकेत; छोट्या गुंतवणूकदारांनी काय करायचं?


अनेक ठिकाणी सुरु असणारं बांधकाम क्षेत्र, कचरा जाळणं, औद्योगिक स्त्रोत, जमिनीवरून वाऱ्याने उडणारी धूळ या कारणांमुळं हवेत धुलिकणांचं प्रमाण वाढत आहे. येत्या काळात शहरातील बांधकामं आणि तत्सम परिस्थितीवर प्रशासन काय तोडगा काढणार आणि त्याचे नागरिकांवर काय परिणाम होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.