मुंबई : देशावर सध्या कोरोनाचं सावट घोंघावतंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन जाहीर केला असला तरी जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरु ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. गरीब कुटुंबापर्यंत शिधा पोहोचवण्याची तरतूद करण्यात आली आहे. असे असले तरीही हातावर पोट असणाऱ्या आज हजारो कुटुंबांचे संसार आज मोडकळीस आले आहेत. लॉकडाऊनचा सर्वात मोठा फटका या वर्गाला बसत आहे. रोजची कमाई करुन उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबाना सध्या सहाय्याची गरज आहे. अनेक सेवाभावी संस्था यामध्ये उतरल्या आहेत. जोगेश्वरीतील 'अलर्ट सिटीझन फोरम' या संस्थेने देखील यात पुढाकार घेतला असून गरजूंपर्यंत अन्नधान्य पोहचवण्याचे काम दिवसरात्र सुरु ठेवले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे काम करत असताना त्यांना एका घरात धान्य वाटपासाठी जावे लागले. समोरची परिस्थिती पाहून स्वयंसेवकांचेही डोळे पाणावले. रेल्वे स्थानकावर कापडाच्या पिशव्या विकणाऱ्या आजी-आजोबांचा तो संसार आहे. 



या घरात राहणारे दोघेही वयवर्षे ८० च्या पलीकडचे आहेत. छोटंस घर, त्यात जगण्याचा संघर्ष करणारे हे ज्येष्ठ दाम्पत्य आहे. यातील आज्जी ना मोतीबिंदू असून या वयात त्या नळाच्या गळणीसाठी लागणाऱ्या कपड्याच्या पिशव्या शिवतात आणि आजोबा दिवसभर स्टेशनला उभे राहून त्या विकतात. एक पिशवी दहा रुपयांना विकली जाते. दिवसाला साधारणा ७ ते ८ पिशव्या विकल्या जातात. पण आता लॉकडाऊनच्या स्थितीत रेल्वे सेवा बंद असल्याने त्यांच्या या रोजगारावर गदा आली. दिवसा अखेर मिळणारे ७० ते ८० रुपये मिळणं देखील कठीण झालं. 



सिटीझन फोरमला या आजी आजोबांबद्दल माहिती मिळाली. आणि क्षणाचाही विलंब न लावता संस्थेचे स्वयंसेवक या आजीआजोबांच्या घरी पोहोचले. त्यांना महिना भराच रेशन देण्यात आलं. संस्थेच्या माध्यमातून त्यांना दत्तक घेण्याचा मानस असल्याचे अलर्ट सिटीझन फोरमचे निरंजन आहेर यांनी सांगितले. ही मदत पोहचून एवढ्या दिवस करत असलेल्या मेहनतीचं समाधान वाटल्याचेही ते म्हणाले.


संताक्रूज वाकोला धोबीघाट येथील दिव्यांग आणि विधवा महिला परिवारांना तसेच मालाड पोद्दार रोड येथील रोजीवर काम करणाऱ्या उपासमार होणाऱ्या मजुरांना देखील अलर्ट सिटीझन फोरमतर्फे अन्नधान्य पोहोचवण्यात आले. 



अलर्ट सिटीझन फोरम आणि जोगेश्वरीच्या नित्यानंद सेवा मंडळाच्या मदतीने  
भायखळा व माझगाव विभागातील दिव्यांग बांधवांना धान्य वाटप करण्यात आले. जय जवान गोविंदा पथक जोगेश्वरी यांच्या वतीने केइएम हॉस्पिटल मधील रुग्णांच्या ६०० नातेवाईकांना जेवणाची मदत करण्यात आली. 


अशा अनेक संस्था आणि व्यक्ती देशभरात गरजूंपर्यंत पोहोचत आहेत. यातूनच आपल्या देशाची एकात्मता दिसून येतेय.