मुंबई प्रदुषणाच्या बाबतीत दिल्लीची बरोबरी करणार?
दिल्ली ही प्रदुषणाच्या बाबतीत कुप्रसिद्ध आहे. पण मुंबईदेखील लवकरच दिल्लीशी स्पर्धा करणार नाही ना, अशी शंका
देवेंद्र कोल्हटकर, झी मीडिया, मुंबई : देशाची राजधानी दिल्ली ही प्रदुषणाच्या बाबतीत कुप्रसिद्ध आहे. पण मुंबईदेखील लवकरच दिल्लीशी स्पर्धा करणार नाही ना, अशी शंका उपस्थित करायला जागा आहे. वाहनांची वाढती संख्या, बांधकामं, विकासकामं यामुळे हवेची पातळी दिवसेंदिवस घसरतेय... बघुयात हा स्पेशल रिपोर्ट. बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स... अर्थात बीकेसी... देशाच्या आर्थिक राजधानीचं कॉर्पोरेट हब... नॅशनल स्टॉक एक्सचेंज, रिझर्व्ह बँकेसह अनेक महत्त्वाची कार्यालयं, मोठी हॉस्पिटल्स याच भागात आहेत.
विकडेजमध्ये अत्यंत गजबजलेला हा भाग मुंबईतला सर्वाधिक प्रदुषितही असल्याचं समोर आलंय. ‘सफर’ या संस्थेनं केलेल्या नोंदींनुसार १ ते २२ डिसेंबर या कालावधीत मुंबईच्या हवेतील सूक्ष्म प्रदूषक कणांचे प्रमाण २ वेळा २०० पार्टिक्युलेट मॅटरपेक्षा जास्त नोंदवलं गेलं आहे.
यामध्ये वांद्रे-कुर्ला संकुलात तर तब्बल १७ वेळा २०० पार्टिक्युलेट मॅटर आणि ३ वेळा ३०० पार्टिक्युलेट मॅटरचा धोकादायक टप्पा ओलांडला गेला आहे.
यामध्ये एक दिवस बीकेसीमधील पातळी ३०२पर्यंत गेली होती. त्याखालोखाल मालाडमध्ये २७३, अंधेरीत २६१, माझगावमध्ये २१७, नवी मुंबईत २१६, चेंबूरमध्ये २०८ एवढ्या वाईट हवेची नोंद झाली आहे.
कुलाब्यामध्ये १९२ पार्टिक्युलेट मॅटर आढळलेत, तर भांडूपमध्ये ७७ची समाधानकारक पातळी नोंदवली गेलीये.
वाहनांमुळे होणारा धूर, कारखान्यांमुळे होणारं वायू प्रदुषण, इमारतींचं बांधकाम, विविध प्रकल्पांची कामं यामुळे हवेतल्या धूलिकणांचं प्रमाण वाढतंय. याचा परिणाम मुंबईकरांच्या आरोग्यावरही होत आहे.
प्रदुषण रोखण्यासाठी सामाजिक संस्था आणि सरकारबरोबरच सर्वसामान्य मुंबईकरांनीही पुढाकार घेण्याची गरज आहे. अन्यथा मुंबईसाठी 'दिल्ली दूर नहीं' असंच म्हणावं लागेल.