मुंबई : आरेची जागा राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे आरेची जागा आता राखीव वन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या निर्देशानुसार आरे दुग्ध वसाहतीच्या ताब्यातील ३२८.९० हेक्टर आणि वन विभागाच्या ताब्यातील ४०.४६ हेक्टर जमीन ही भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४ अन्वये राखीव वन घोषित करण्याच्या प्राथमिक अधिसूचनेस आज मान्यता देण्यात आली आहे, अशी माहिती वनमंत्री संजय राठोड यांनी दिली.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरे दुग्ध वसाहत येथील जमीन ही राखीव वन म्हणून घोषित करावी याबाबत दिनांक २ सप्टेंबर २०२०  रोजी मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांनी संबंधितांना निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने आज दुग्ध व्यवसाय विभाग व वन विभाग यांच्याकडून भारतीय वन अधिनियम १९२७ चे कलम ४ची प्राथमिक अधिसूचना व मनोदय घोषित करण्याची अधिसूचना काढण्यास मंजुरी देण्याचा प्रस्ताव प्राप्त झाला होता. त्यानुसार प्राथमिक अधिसूचनेस मंजुरी प्रदान केली आहे. त्यानंतर चौकशी होऊन भारतीय वन अधिनियम १९२७चे कलम २०ची अंतिम अधिसूचना काढण्यात येईल, असेही वनमंत्र्यांनी सांगितले.


प्राथमिक अधिसूचनेनुसार वन जमाबंदी अधिकारी (कोकण) नवी मुंबई हे या जमिनीवरील हक्क, स्वरूप, व्याप्ती याबाबत चौकशी करतील तर त्यांच्या निर्णयाच्या विरुद्ध जिल्हाधिकारी मुंबई उपनगर यांच्याकडे अपील करता येईल, अशी माहितीही  राठोड यांनी दिली.