Tahawwur Rana : मुंबईवर झालेल्या 26 /11 दहशतवादी हल्ल्यातील मोठी अपडेट समोर आली आहे. (Mumbai Attack) कॅलिफोर्निया येथील अमेरिकेतील न्यायालयाने 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला भारताकडे सुपूर्द करण्यास परवानगी दिली आहे. 10 जून 2020 रोजी भारताने 62 वर्षीय राणाला प्रत्यार्पणाच्या उद्देशाने तात्पुरती अटक करण्याची तक्रार दाखल केली. अमेरिकन अध्यक्ष ज्यो बायडेन प्रशासनाने राणाच्या भारतात प्रत्यार्पणाला पाठिंबा दिला आणि त्याला मान्यताही दिली. त्यामुळे भारताला हे मोठे यश मिळाले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा याला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण करण्यात येणार आहे. गेले काही दिवस याबाबत राष्ट्रीय तपास यंत्रणा (NIA) कार्यवाही सुरु केली होती. अधिकृत सूत्रांनी सोमवारी ही माहिती दिली. अमेरिकेच्या न्यायालयाने अलीकडेच राणा यांच्या अभियोगासोबत झालेल्या भेटीबाबतची स्टेटस कॉन्फरन्स नाकारली होती. मात्र, आता अमेरिकन न्यायालयाने भारताच्या ताब्यात देण्यास मान्यता दिली आहे.


16 मे रोजीच्या 48 पानांच्या आदेशात, कॅलिफोर्नियाच्या सेंट्रल डिस्ट्रिक्टसाठी जिल्हा न्यायालयाच्या न्यायाधीश जॅकलिन चूलजियन यांनी सांगितले की, भारताने सुनावणीच्या वेळी सादर केलेल्या युक्तिवादांमध्ये आणि सर्व कागदपत्रांचे न्यायालयाने पुनरावलोकन केले आणि त्यावर विचार केला. ज्या गुन्ह्यांसाठी त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती करण्यात आली आहे त्या गुन्ह्यांसाठी 62 वर्षीय तहव्वूर राणा प्रत्यार्पण करण्यायोग्य असल्याचा निष्कर्ष न्यायालयाने काढला आहे, असे न्यायाधीशांनी सांगितले.


 तहव्वूर राणा याला भारतात आणण्याची तयारी  


26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील त्याच्या भूमिकेसाठी भारताने त्याच्या प्रत्यार्पणाची विनंती केल्यानंतर राणाला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. त्याला भारतात आणण्यासाठी कार्यवाही सुरु करण्यास तयार असल्याचे एनआयएने म्हटले आहे. पाकिस्तानस्थित लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवाद्यांनी केलेल्या 26 /11 च्या हल्ल्यातील राणाच्या भूमिकेची एनआयएकडून चौकशी सुरु आहे.


न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान, अमेरिकन सरकारच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की, राणा याला माहित होते की त्याचा बालपणीचा मित्र, पाकिस्तानी  अमेरिकन डेव्हिड कोलमन हेडली हा लष्कर-ए-तैयबामध्ये सामील होता आणि त्यामुळे हेडलीला त्याच्या कारवायांमध्ये मदत केली. दहशतवादी संघटना आणि त्यांचे सहकारी यांनाही त्याने मदत केली.


दुसरीकडे राणाच्या वकिलाने प्रत्यार्पणाला विरोध केला. मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सहा अमेरिकनांसह एकूण 166 जणांचा मृत्यू झाला होता. हे हल्ले 10 पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केले होते. मुंबईतील अत्यंत प्रतिष्ठित आणि महत्त्वाच्या ठिकाणी हे हल्ले 60 तासांहून अधिक काळ सुरु होते.


भारत आणि अमेरिका यांच्यात प्रत्यार्पण करार आहे. राणाचे भारतात प्रत्यार्पण करणे हे पूर्णपणे कराराच्या अधिकारक्षेत्रात आहे, असा निकाल न्यायाधीशांनी दिला. या हल्ल्यांमध्ये दहशतवादी अजमल कसाब जिवंत पकडला गेला होता. त्याला 21 नोव्हेंबर 2012 रोजी भारतात फाशी देण्यात आली होती. या हल्ल्यादरम्यान उर्वरित दहशतवादी भारतीय सुरक्षा दलांचा जवानांना ठार केले होते.