थँक्यू गोडसे ! गांधींचे फोटो, पुतळे हटवा; पालिका उपायुक्त चौधरींचे वादग्रस्त ट्विट
मुंबई महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी एक ट्विट केल्यामुळे त्या वादात सापडल्या आहेत.
मुंबई : महापालिकेच्या उपायुक्त निधी चौधरी यांनी एक ट्विट केल्यामुळे त्या वादात सापडल्या आहेत. चौधरी यांनी ट्विट करताना नोटांवरून महात्मा गांधी यांचा फोटो आणि त्यांचे पुतळे हटविण्याची मागणी केली. त्याचवेळी त्यांनी नथुराम गोडसेचे आभार मानणारे ट्विट केले होते. या ट्विटनंतर त्यांच्यावर जोरदार टीका झाली. आपले ट्विट वादाला कारण ठरत असल्याचे लक्षात येताच त्यांनी ते ट्विट डिलीट केले. त्यानंतर आपली बाजू मांडण्यासाठी दुसरे ट्विट करत सारवासारव केली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे जितेंद्र आव्हाड यांनी चौधरी यांची महापालिकेच्या सेवेतून हकालपट्टी करण्याची मागणी केली आहे.
निधी चौधरी या २०१२च्या बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्या मुंबई महापालिकेत उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी उपजिल्हाधिकारी म्हणूनही काम पाहिले आहे. १७ मे रोजी त्यांनी हे वादग्रस्त ट्विट केले होते. 'आपण महात्मा गांधी यांची १५० जयंती उत्साहात साजरी करत आहोत. नोटांवरून गांधीजींचा फोटो हटविण्याची हीच वेळ आहे. गांधीजी यांचे पुतळे हटविण्यात यावेत, संस्था आणि रस्त्यांना देण्यात आलेली त्यांची नावे हटविण्यात यावीत. हीच आपल्या सर्वांकडून त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल. थँक्यू गोडसे!' ३० जानेवारी १९४८ . असे वादग्रस्त ट्विट त्यांनी केले होते.
नेटकऱ्यांनीही चौधरी यांच्यावर टीका केली. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसनेही या ट्विटवर जोरदार आक्षेप घेतला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महात्मा गांधींविरोधात अवमानकारक ट्विट करणाऱ्या चौधरींना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी केली आहे. चौधरींनी नथुराम गोडसेंचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न केला आहे. हे सहन केले जाणार नाही, असा इशारा जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.
दरम्यान, ट्विटवरून वाद होताच चौधरी यांनी हे ट्विट डिलीट केले. '१७ मे रोजी करण्यात आलेलं ट्विट मी डिलीट केले आहे. कारण काही लोकांचा गैरसमज झाला आहे. मी गांधीजींचा अनादर करू शकत नाही. मी श्रद्धापूर्वक गांधीजींचा आदर करत असून शेवटच्या श्वासापर्यंत त्यांचा आदर करत राहिने, असे त्यांनी नव्या ट्विटमध्ये म्हटले आहे.