कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : मुबईतल्या सर्व पाच टोल नाक्यांवर लाडू-पेढे वाटून दिवाळी साजरी करण्यात आली. कारण मुंबईतल्या एंट्री गेट टोल नाक्यांवर कारचालकांकडून सोमवारी शेवटचा टोल वसुल करण्यात आला. राज्य सरकारनं मुंबईच्या प्रवेशद्वारांवरील पाच टोल नाक्यांवर छोट्या वाहनांसाठी टोलमाफी (Toll Free) जाहीर केलीय. त्यानुसार वाशी, दहिसर, मुलुंड पश्चिम, ऐरोली आणि मुंलुंड पूर्व या टोलनाक्यावर कारचालकांना टोलमुक्ती मिळालीय. एसटी आणि स्कूलबसही टोलमधून दिलासा देण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (CM Eknath Shinde) लाडका प्रवासी योजना सुरु केल्याचा दावा केलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरकारच्या या टोलमाफीवर संशय व्यक्त केला जाऊ लागलाय. टोलमाफीतून ठेकेदारांचं उखळ पांढरं होणार असल्याचा संशय विरोधकांनी व्यक्त केलाय. 2026 पर्यंत टोलवसुलीची मुदत होती. ती वेळेआधी संपुष्टात आणण्यात आलीय. मुंबई एंट्री पॉईंटचे टोलमाफीच्या मोबदल्यात ठेकेदारांना मोठी रक्कम द्यावी लागणार आहे. ही रक्कम साडेतीन हजार कोटींच्या घरात असेल असं सांगण्यात येतंय. हे पैसे सरकारच्या तिजोरीतून द्यावे लागणार असल्याचे संकेतच एमएसआरडीसी मंत्री दादा भुसेंनी दिलेत.


टोलमाफीवर विरोधकांना संशय
सरकारला टोलमाफी देण्यामागं टोल ठेकेदारांना लाभ मिळवून देण्याचा हेतू तर नाही ना असा आरोपही शिवसेना ठाकरे गटानं केलाय. दोन वर्षांपूर्वी टोल ठेकेदार बदलण्यात आले या ठेकेदारांना लाभ व्हावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय घेतला नाही ना असा संशय सचिन अहिर यांनी व्यक्त केलाय.सरकारला टोलमाफी द्यायचीच आहे तर वरळी-वांद्रे सिलिंक, अटल सेतूला टोलमुक्ती का दिली नाही असा सवालही उपस्थित करण्यात आलाय. विधानसभा निवडणुकीत मुंबईकरांना खूष करण्यासाठी टोलमुक्तीचा निर्णय घेण्यात आला असावा असाल टोलाही शिवसेना ठाकरे गटानं लगावलाय.


मुख्यमंत्र्यांचं विरोधकांना उत्तर
मुंबईतील टोलमाफीनंतर विरोधकांनी हा निवडणुकीचा जुमला असल्याची टीका केलीय. याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी उत्तर दिलंय. हा निर्णय निवडणुकीपुरता नाही, तर तो कायमस्वरुपी असल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलंय. या ऐतिहासिक निर्णयाचा लाखो लोकांना फायदा होईल, असंही शिंदेंनी म्हटलंय. टोलमाफीच्या निर्णयाचं महायुतीतील नेत्यांनी स्वागत केलंय.


मुंबईकरांच्या भल्यासाठी टोलमुक्तीचा निर्णय घेतल्याचं सरकार सांगत असलं तरी विरोधकांचा यावर विश्वास नाही. मुंबईकरांना टोलमुक्तीची फळं किती चाखायला मिळतील माहिती नाही पण ठेकेदारांचं मात्र यातून चांगभलं झालंय एवढं मात्र खरं.