कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : मुंबईतील 2030 घरांसाठी म्हाडाने लॉटरी जाहीर केली आहे. गोरेगाव, अँटॉप हिल, कोपरी पवई, कन्नमवार नगर आणि मालाड या गृहनिर्माण प्रकल्पांमधील विविध उत्पन्न गटांतील घरांची विक्री केली जाणार आहे. 9 ऑगस्टला ऑनलाईन नोंदणीला सुरुवात झाली असून 13 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता सोडत काढली जाणार आहे.  मुंबईत हक्काच्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्यांसाठी हा मोठा दिलासा आहे. परवडणाऱ्या घरांमुळे म्हाडाच्या घरांसाठी लाखोंनी नोंदणी केली जाते. पण याचा फायदा उचलत घराची स्वप्न पाहाणाऱ्यांची फसवणूक केली जात असल्याचं समोर आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

म्हाडाच्या संकेतस्थळावरुन फसवणूक
म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाची (MHADA Website) हुबेहुब कॉपी करुन लोकांची फसवणूक केली जात आहे.  Mhada.Org या बोगस संकेतस्थळावरुन चार नागरिकांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळाशी साधर्म्य असलेल्या या बोगस संकेतस्थळात फोटो आणि रंगसंगती हुबेहुबे बवनण्यात आली आहे. त्यामुळे लोकांची फसवणूक होत आहे. या वेबसाईटवर सहा लाख रुपये भरा आणि 29 लाख रुपया घर मिळवा अशी जाहीरात करण्यात आली आहे. म्हाडाच्या आयटी विभागाने सायर सेलकडे यासंदर्भात तक्रार केली आहे. वास्तविक म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर पैसे भरण्यासाठी कोणताही पर्याय देण्यात आलेला नाही. पण बनावट वेबसाईटवर पेमेंट ऑप्शन देण्यात आला आहे. लोकं या पेमेंट ऑप्शनवर क्लिक करुन पैसे भरत आहेत. 


बनावट वेबसाईटपासून सावध राहा असं आवाहन म्हाडाच्या आयटी विभागाने केलं आहे. म्हाडाने कोणालाही प्रतिनिधी, सल्लागार आणि प्रॉपर्टी एजंट म्हणून नेमलेले नाही. अर्जदाराने कोणाशीही व्यवहार करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरच अर्ज नोंदणी, अर्ज भरणा आणि अनामत जमा प्रक्रिया सुरु आहे.


कोणत्या गटासाठी किती घरं उपलब्ध?
म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन अर्जाची मुदत 4 सप्टेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत ठेवण्यात आलेली आहे. अनामत रकमेची ऑनलाइन स्वीकृती 4 सप्टेंबर रात्री 11:59 पर्यंत केली जाईल. अर्जाची अंतिम यादी 11 सप्टेंबरला संध्याकाळी 6 वाजता प्रसिद्ध केली जाणार आहे. 


अत्यल्प गट - 359 घरं
अल्प उत्पन्न गट - 627 घरं
मध्यम उत्पन्न गट - 668 घरं
उच्च उत्पन्न गट - 276 घरं


वार्षिक उत्पन्न मर्यादा 
अत्यल्प गट -  वार्षिक 6 लाख रुपये
अल्प उत्पन्न गट - वार्षिक 9 लाख रुपये
मध्यम उत्पन्न गट - 12 लाख रुपये
उच्च उत्पन्न गट - 12 लाखांहून अधिक