Salman Khan House Firing Case : बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणातील आरोपी अनुज थापन (Anuj Thapan) याने आत्महत्या केलीये. पोलीस कोठडीत आत्महत्या केल्याने याचा तपास राज्य सीआयडी करणार आहे. आरोपी अनुजने लॉकअपमध्ये चादरीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची माहिती समोर येतेय. सलमान खान घरावर गोळीबार प्रकरणात अनुज थापनने आरोपींना हत्यारं पुरवल्याचा आरोप होता. सलमान खानच्या (Salman Khan) घरावरील गोळीबार प्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केलीये. त्यांना 8 मेपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलीये. त्यापैकी एक आरोपी असलेल्या अनुज थापननं आत्महत्या केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरोपी अनुज थापनने क्राईम ब्रांचच्या लॉकअपमध्ये चादरीने गळफास घेतला. आरोपीचं पोस्टमॉर्टम मुंबईतल्या जे जे रुग्णालयात (J J Hospital) होणार आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत आरोपी अनुज थापन लॉरेन्स बिश्नोई गँगच्या संपर्कात होता. मुंबई पोलिसांनी अनुजला पंजाबमधून अटक केली होती. 


कोण होता अनुज थापन?
अनुज थापन हा बिश्नोई गँगमध्ये सक्रिय होता. लॉरेन्स बिश्नोईच्या सांगण्यावरुन अनुजने सागर पाल आणि विक्की गुप्ताला पिस्तूल आणि 40 काडतूसं दिली होती. त्यानंतर सागर आणि विक्की 14 एप्रिलला मुंबईत पोहोचले. पहाटेच्या सुमारास या दोघांनी सलमान खानच्या मुंबईतील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पाच राऊंड फायर केले. त्यांना पूर्ण चाळीस राऊंड फायर करण्याचे आदेश होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. गोळीबार केल्यानंतर सागर आणि विक्की गुजरातला पळाले. मुंबई पोलिसांनी गुजरातमधल्या भूजमधून या दोघांना अटक केली.


पंजाबमधून अनुजला अटक
सागर आणि विकीच्या पोलीस चौकशीत सोनू चंदर आणि अनुज थापनची नावं समोर आली. त्यानंतर मंबई पोलिसांनी पंजाबमध्ये जात अनुजला अटक केली. तेव्हापासून अनुज मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या कस्टडीत होता. अनुजने पिस्तूल आणि काडतूसं कुठून मिळवली आणि पूर्ण सिंडेकटचा शोध घेण्याचा प्रयत्न मुंबई पोलीस करत होते.


सर्व आरोपींवर मोक्का
मुंबई पोलिसांनी अटक केलेल्या सर्व आरोपींवर मोक्का कायदा लावलाय. सलमान खानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटच्या सुरक्षा रक्षकाच्या तक्रारीच्या आधारे मुंबई पोलिसांनी आरोपींवर कलम 307 (जीवे मारण्याचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर आणखी तीन कलमं त्यात जोडण्यात आली. त्यानंतर आणखी तीन कलमं त्यात जोडण्यात आली. यात कलम 506(2) धमकी देणं, 115 भडकावणं आणि 201 पुरावे नष्ट करणं असे गुन्हे दाखल करण्यात आलेत.