मुंबईकर तरूणांनी लंडनमध्ये विकले वडापाव, कमावले ४.३९ कोटी रूपये
जेव्हा परतीचे दोर कापले जातात तेव्हा, लढण्याला पर्याय नसतो. जीवावर उदार होऊन केलेल्या अशा लढाईत अपरंपार मेहनत, जीद्द आणि चिकाटीची कसोटी लागते. पण, या संघर्षाचा होणारा शेवटही गोड ठरतो. मुंबईतील दोन तरूणांबाबतही असेच घडले. या पठ्ठ्यांनी सातासमुद्रापार असलेल्या लंडनमध्ये केवळ वडापाव विकून तब्बल ४.३९ कोटी रूपये कमावले आहेत.
अण्णासाहेब चवरे, झी मीडिया, मुंबई : जेव्हा परतीचे दोर कापले जातात तेव्हा, लढण्याला पर्याय नसतो. जीवावर उदार होऊन केलेल्या अशा लढाईत अपरंपार मेहनत, जीद्द आणि चिकाटीची कसोटी लागते. पण, या संघर्षाचा होणारा शेवटही गोड ठरतो. मुंबईतील दोन तरूणांबाबतही असेच घडले. या पठ्ठ्यांनी सातासमुद्रापार असलेल्या लंडनमध्ये केवळ वडापाव विकून तब्बल ४.३९ कोटी रूपये कमावले आहेत.
नोकरीला पर्याय आहे
सुजय सोहनी आणि सुबोध जोशी अशी या तरूणांची नावे आहेत. २००९ अवघे जग मंदीच्या संकटाने झाकोळून गेले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. अनेकांचे व्यवसाय बुडाले. सुजय आणि सुबोधसोबतही असेच घडले. या दोघांनाही मंदीचा फटका बसला. यांच्या नोकऱ्या गेल्या. कहाणी सात वर्षांपूर्वीची आहे. सुजय सोहनी हा तरूण तेव्हा लंडनमध्ये एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये फूड अॅण्ड बेव्हरेज मॅनेजर म्हणून काम करत होता. मंदीच्या तडाख्यात त्याची नोकरी गेली. दुसरा पर्याय नव्हता आणि मंदीमुळे नोकरीही मिळत नव्हती. दुसरीकडे त्याचा दोस्त सुबोध जोशीचीही कहाणी वेगळी नव्हती. बोलता बोलता सुबोधने सांगितले की, आता माझ्याकडे वडापाव खायलाही पैसे नाहीत. झाले. इथेच त्यांना त्यांचा मार्ग गवसला. चर्चेदरम्यान, त्यांनी वडापावची गाडी सुरू करण्याचा निर्णय घेतला.
मार्ग हा निघतोच
मराठी तरूणाला कष्टाचे कधीच वावडे नसते. मिळेल तो पगार आणि पडेल ते काम आणि तेही प्रतिकूल परिस्थीतीत करण्याची त्याची नेहमीच तयारी असते. त्यांनी निर्णय प्रत्यक्षात उतरवला. पण, मिड डे ने दिलेल्या वृत्तानुसार त्यांच्या समोर अडचण अशी होती की, स्वस्तात वडापाव विकू इच्छिणाऱ्या या मित्रांसाठी कमी पैशात जागा मिळणे फार कठीण होते. अखेर, जोरात हातपाय हालवल्यावर त्यांना एका आईस्क्रीम कॅफेने वडापाव विकण्यासाठी जागा दिली. जागाभाडे म्हणून प्रतिमहिना ३५ हजार रूपये देण्याचा व्यवहार ठरला.
कष्टाला कल्पकतेची जोड हवी
व्यवसायाची सुरूवात तर झाली, पुढे या तरूणांनी मागे वळून पाहिले नाही. १ पाऊंडला म्हणजेच ८० रूपयांना वडापाव तर, १.५० रूपयांना म्हणजेच १५० रूपयांना दाबेली या दराने त्यांनी सुरूवात केली. सुरूवातीला या मंडळींना फारसा फायदा होत नव्हता. एणारे उत्पन्न मुदलात सुटायचे. मग या मंडळींनी एक शक्कल लडवली. त्यांनी रस्त्यावरच्या मंडळींना वडापाव फुकट वाटण्यास सुरूवात केली. वडापाव वाटताना ते त्याची इंडियन बर्गर अशी जाहिरात करायचे. त्यांची ही मात्रा भलतीच लागू पडली. हा हा म्हणता म्हणता लंडणकरांनी वडापावला डोक्यावर घेतले.
कष्ट वाया जात नाही
सध्या सुजय आणि सुबोधचा व्यवसाय चांगलाच फोफावत आहे. आता त्यांनी आपल्या मुळ ठिकाणाजवळच आणखी एक वडापावची शॉप सुरू केले आहे. सध्या दोघांच्या रेस्टॉरंटच्या तीन-तीन शाखा आहेत. ज्यात ३५ लोक काम करतात. त्यांच्या मेन्युकार्डमध्ये आता केवळ वडापावच नव्हे तर, इतरही ६० भारतीय पदार्थांची रेलचेल आहे. नुकतीच त्यांना एका पंजाबी रेस्टॉरंटने सोबत व्यवसाय करण्याची ऑफरही दिली. ही ऑफर त्यांनी स्विकारली. आता श्री कृष्ण वडा पाव अनेकांच्या पोटाचा आणि पर्यायाने आयुष्याचाही भाग झाला आहे.