धोका! कोरोनामुळे वोकहार्ट रुग्णालय `कंटेनमेंट झोन`
सावधगिरी म्हणून मोठा निर्णय
मुंबई : Coronavirusमुळे आता मुंबई सेंट्रल येथे असणाऱ्या वोकहार्ट रुग्णालयाला कंटेनमेंट झोन जाहीर केल्याचं वृत्त समोर येत आहे. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे हे पाऊल उचलण्यात आल्याचं वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलं आहे.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिका आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची योग्य ती काळजी घेतली जात नसल्यामुळे रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोलाची लागण झाल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आला होता. पण, हे सर्व आरोप रुग्णालयाकडून मात्र फेटाळण्यात आले. अखेर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना क्वारंटाईन करत संपूर्ण रुग्णालयच सील करण्याचा निर्णय घेण्यात आला.
सध्याच्या घडीला रुग्णालयच सील केल्यामुळे तेथील ओपीडीची सेवाही आणि इतरही वैद्यकीय सेवा बंद करण्यात आल्या आहेत. शिवाय कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या रुग्णांची प्रकृती स्थिर झाल्यानंतर त्यांना घरी पाठवण्यात आलं होतं.
कस्तुरबा रुग्णालयातून कोरोनाची लागण झालेले आणि संशयित असे जवळपास २० रुग्ण वोकहार्टमध्ये जाखल करण्यात आले होते. ज्यापैकी कोरोनाबाधितांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं होतं. पण, संशयितांना मात्र इतर रुग्णांसोबतच ठेवण्यात आलं होतं. शिवाय या रुग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारिकांना आवश्यक अरे मास्क आणि पोशाख अशी साधनं देण्यात आली नसल्याचीही बाब समोर आली होती. संशयितांपैकीही दोघांना कोरोनाची लागण झाल्याचं उघड झालं. ज्यानंतर येथील परिचारिका आणि कर्मचाऱ्यांमध्ये संसर्ग वाढू लागला. त्यामुळेच रुग्णालयाच्या हलगर्जीपणावर परिचारिकांच्या नातेवाईकांडून रोष व्यक्त केला गेला.