COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मुंबई : घाटकोपर विमान दुर्घटना नेमकी कशी झाली. आकाशातून ज्या इमारतीच्या बाजुला रस्त्यावर विमान कोसळलं तो चित्त थरारक प्रकार बाजुच्याच ईमारतीतल्या एका घराच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. हे विमान रस्त्यावर कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. विशेष म्हणजे विमान रस्त्यावर कोसळताना मागून एक चारचाकी वाहन येत होतं. मात्र या वाहनाचं नेमकं काय झालं याबाबत अजून तपशील मिळू शकलेला नाही. घाटकोपरमध्ये चार्टर्ड विमान कोसळून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. सी ९० जातीचं हे चार्टर्ड प्लेन होतं, दोन वैमानिक, दोन इंजिन असलेल्या या विमानानं जुहू विमानतळावरुन उड्डाण केलं होतं.


उड्डाण केल्याच्या काही वेळातच घाटकोपरमधल्या सर्वोदय रुग्णालयाजवळ हे विमान कोसळलं. बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवर हे विमान कोसळलं. एकेकाळी उत्तर प्रदेश सरकारचं असलेलं हे विमान २०१४ साली युवाय अॅव्हिएशनला विकण्यात आलं होतं. या विमानानं प्रशिक्षणासाठी उड्डाण केलं होतं. या अपघातात विमानातल्या चौघांसह एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मुख्य वैमानिक प्रदीप राजपूत, महिला सहवैमानिक मारिया, विमान तंत्रज्ञ सुरभी आणि मनीष पांडे यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे.