कोस्टल रोडच्या कामाला मे महिन्यात सुरुवात - मुख्यमंत्री
कोस्टल रोडच्या कामाला मे महिन्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यानच्या प्रस्तावित कोस्टल रोडच्या कामास पर्यावरण खात्याची मंजुरी मिळालेली आहे.
मुंबई : कोस्टल रोडच्या कामाला मे महिन्यापासून सुरुवात करण्यात येणार आहे. नरिमन पॉइंट ते कांदिवली दरम्यानच्या प्रस्तावित कोस्टल रोडच्या कामास पर्यावरण खात्याची मंजुरी मिळालेली आहे.
निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात
याबाबतची मुंबई महानगरपालिकेची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून येत्या मे महिन्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानपरिषदेत लेखी उत्तरात दिली.
काँग्रेसचा तारांकीत प्रश्न
मुंबईतील कोस्टल रोडच्या कामास विलंब होत असल्याबाबत काँग्रेस सदस्य संजय दत्त यांनी तारांकीत प्रश्न मांडला होता. त्यावरील लेखी उत्तरात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, प्रस्तावित नरिमन पॉइंट ते कांदिवली या सागरी मार्गाची प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी आणि वांद्रे ते कांदिवली जंक्शन लिंक रोड अशा दोन भागांत विभागणी झाली आहे. महापालिकेची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.
सागरी सेतू बांधण्यात येणार
वांद्रे ते कांदिवली जंक्शन लिंक रोड या टप्प्यासंदर्भात वांद्रे ते वसोर्वापर्यंत महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत सागरी सेतू बांधण्यात येणार असून या कामास पर्यावरण विभागाची मंजुरी मिळालेली आहे. महामंडळाने या कामाच्या निविदा मागविल्या असून लवकरच काम सुरू करण्याचे आदेश देण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.