मुंबई कोस्टल रोडच्या वेळेत महत्वाचे बदल, BMC कडून घोषणा
Mumbai Coastal Road Time Changes: : मुंबई कोस्टल रोडने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे.
Mumbai Coastal Road Time Changes: मुंबई कोस्टल रोडने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे. धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील वाहतूक व्यवस्थेच्या वेळेत महत्वाचे बदल करण्यात आले आहेत. तुम्हाला या रोडने प्रवास करायचा असेल तर आधी वेळ माहिती करुन घ्या.
92 टक्के काम पूर्ण
बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्प हा शामलदास गांधी मार्ग (प्रिन्सेस स्ट्रीट) उड्डाणपूल ते वांद्रे - वरळी सागरी सेतूच्या वरळी टोकापर्यंत बांधण्यात येत आहे. आजतागायत या प्रकल्पाचे 92 टक्के काम पूर्ण झाले आहे. दरम्यान मुंबई कोस्टल रोड आठवड्यातील सातही दिवस सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.
वाहतुकीच्या वेळा
गणेशोत्सवादरम्यान मुंबई किनारी रस्ता प्रकल्प हा 6 सप्टेंबर 2024 ते 18 सप्टेंबर या कालावधीत 24 तास वाहतुकीसाठी खुला होता. आता, शनिवार 21 सप्टेंबरपासून मुंबई किनारी रस्ता प्रकल्प वाहतुकीसाठी आठवड्यातील सातही दिवस सकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तर, रात्री 12 ते सकाळी 7 या वेळेत वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.
या मार्गिका मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या
दक्षिणवाहिनी बिंदूमाधव ठाकरे चौक, रजनी पटेल चौक (लोटस जंक्शन) आणि अमरसन्स उद्यान ते मरीन ड्राईव्ह ही मार्गिका तसेच, उत्तरवाहिनी मरीन ड्राईव्ह, हाजी अली आणि रजनी पटेल चौक (लोटस जंक्शन) ते वांद्रे वरळी सागरी सेतूपर्यंतची (राजीव गांधी सागरी सेतू) मार्गिका वाहतुकीसाठी खुली राहणार आहे.
वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करा
दरम्यान, धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता प्रकल्पाचे (दक्षिण) उर्वरित कामकाज वेगाने सुरू आहे. वाहनचालकांनी वेगमर्यादा, वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. वाहतूक शिस्त पाळावी. वाहने चालविताना अधिकची काळजी घ्यावी. अपघात टाळावेत आणि महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.