आढावा बैठकीत काँग्रेसची अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर
संजय निरुपम यांना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी द्यायला पक्षातून विरोध होतोय
मुंबई : मुंबईतील लोकसभा मतदार संघ आढावा बैठकीत गोंधळ झाला. संजय निरुपम यांना मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी विरोध केला. काही नेते पक्षात आले पण पक्षाची संस्कृती अंगवळणी पडलेली नाही. संजय निरूपम यांनी उत्तर मुंबईतून निवडणूक लढवली होती. पण या मतदार संघातून भाजपचे गोपाळ शेट्टी हे मजबूत उमेदवार असल्याने निरूपम यांना मतदार संघ बदलायचा आहे. निरूपम यांना गुरूदास कामत यांच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढायची आहे. याच जागेवर कृपाशंकर सिंह यांनीही दावा केलाय. निरुपम यांना उत्तर पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी द्यायला पक्षातून विरोध होतोय.
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदार संघातील उमेदवारीवरून नसीम खान आणि प्रिया दत्त यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. अखेरीस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना कार्यकर्त्यांना शांत करावे लागले.
उल्लेखनीय म्हणजे, काही दिवसांपूर्वीच काँग्रेसच्या माजी खासदार प्रिया दत्त यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेण्याची घोषणा एका निवेदनाद्वारे केली होती. माझ्या आयुष्यातील गेली काही वर्षे उत्कंठावर्धक आणि खूप काही शिकवणारी होती. मात्र, या सगळ्यात मला राजकीय व वैयक्तिक जीवनाचा मेळ साधण्यात बरीच कसरत करावी लागत आहे. तरीही मी शक्य तितकी चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु, या सगळ्यामुळे माझ्या आयुष्यातील इतर गोष्टींसाठी पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यामुळे आपण निवडणुकीतून माघार घेत असल्याचं प्रिया दत्त यांनी म्हटलं होतं. परंतु, प्रिया दत्त यांनी अंतर्गत गटबाजीला कंटाळून हा निर्णय घेतल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती.