मुंबई : मुंबई कॉग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. उत्तर भारतीय ओबीसी आणि अनुसूचित जातीच्या नागरिकांच्या समस्या मांडण्याच्या उद्देशानं ही भेट झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र निरुपम यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आपल्याला पदावरून हटवण्याचा अधिकार फक्त पक्षाध्यक्ष राहुल गांधींना असल्याचं निरुपम यांनी म्हटलंय. मुख्यमंत्र्यांनी कृपाशंकर सिंग यांच्या घरी जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं होतं... त्यातच आता निरुपम स्वतः वर्षावर गेले. मुंबई काँग्रेसमधल्या दोन्ही गटांचे नेते भाजपाच्या संपर्कात असल्याचं यामुळे समोर आलंय.


दुसरीकडे पक्षाचे ज्येष्ठ नेते हुसेन दलवाई यांनीही मुंबई काँग्रेसमध्ये गटबाजी असल्याची कबुलीच दिलीये... मात्र निवडणुकीच्या तोंडावर ही गटबाजी बाजुला सारून एकदिलानं पक्ष उभा राहावा, यासाठी प्रयत्न सुरू असल्याचंही त्यांनी नमूद केलंय.


निरुपम यांच्यावरून काँग्रेसमध्ये संघर्ष


निरुपम यांना हटवून मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेस अध्यक्ष करण्यासाठी कामत-देवरा गटाने पक्षश्रेष्ठींकडे लॉबिंग सुरु केलं आहे. दुसरीकडे निरुपम यांचे अध्यक्षपद वाचवण्यासाठी निरुपम समर्थक देखील सक्रीय झाले आहेत. त्यामुळं आगामी काळात मुंबई काँग्रेसमधील संघर्ष वाढण्याची चिन्हे आहेत. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या समर्थकांनी काँग्रेसचे महाराष्ट्र राज्य प्रभारी मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली.


निरुपम यांच्या कारभाराविरोधात अनेक दिवस मुंबई काँग्रेसमध्ये बंडाचं वातावरण आहे. काँग्रेस आमदार नसिम खान, अमिन पटेल, वर्षा गायकवाड, भाई जगताप तसेच माजी खासदार एकनाथ गायकवाड, माजी आमदार बाबा सिद्दीकी, माजी मंत्री कृपाशंकर सिंग, काँग्रेसचे पालिकेतील नेते रवी राजा, माजी आमदार युसूफ अब्राहनी, माजी आमदार मधू चव्हाण या सर्व प्रमुख नेत्यांनी खरगे यांची भेट घेतली.


मुंबई महापालिकेत काँग्रेसच्या अपयशानंतर तरी संजय निरुपम यांना हटवण्यात येईल अशी त्यांच्या विरोधकांना आशा होती. पण तत्कालीन प्रभारी यांच्यामुळे त्यांचं पद कायम राहिलं. आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत यामुळे काँग्रेला फटका बसण्याची चिन्ह आहेत. निरुपम विरोधी गटाने १९ सप्टेंबरला पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे देखील भेटण्याची वेळ मागितली आहे.