कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई: कोविड १९ संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून लक्ष्य निर्धारित करुन होत असलेल्या उपाययोजना योग्य दिशेने होत आहेत. मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ५० दिवसांवर नेण्याचे उद्दिष्ट गाठल्याने ते सिद्ध झाले आहे. यासोबत महत्त्वाची बाब म्हणजे उपचार घेऊन बरे होणाऱया रुग्णांचे प्रमाणही आता ७० टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे. 

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोविड १९ संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येक उपाययोजना करताना योग्य नियोजन, अंमलबजावणीची निश्चित दिशा आणि सातत्याने पाठपुरावा करुन प्रत्येक कार्यवाही केली जात आहे. महानगरपालिका आयुक्त श्री. इकबाल सिंह चहल यांच्या निर्देशानुसार प्रत्येक धोरण आखताना त्यामध्ये लक्ष्य निर्धारित कामगिरी करण्यावर प्रशासनाकडून सांघिक भर दिला जात आहे. सर्वात आधी प्रतिबंधित क्षेत्रांचे योग्य व्यवस्थापन करण्यात आले. त्यानंतर विषाणूचा पाठलाग (चेस द व्हायरस) या धोरणातून बाधित, संशयित रुग्णांचा व्यापक मोहीमेतून शोध घेणे, त्यांच्या संपर्कातील व्यक्तिंचे अधिकाधिक संस्थात्मक अलगीकरण करणे, घरोघरी जाऊन व फिरत्या दवाखान्यांच्या माध्यमातून तसेच विशेष शिबिरांतून जास्तीत जास्त चाचण्या करीत रुग्ण वेळीच शोधणे व त्यांच्यावर उपचार करणे, रुग्णालयांसह ठिकठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या रुग्णालयांमध्ये पुरेशा व गुणवत्तापूर्ण उपचार सुविधा निर्माण करणे, परिणामकारक अशा औषधी साठा उपलब्ध करुन त्या आधारे उपचारांवर भर देणे अशा एक ना अनेक चौफेर उपाययोजनांनी कोविड १९ संसर्ग नियंत्रणात आणायला मदत होते आहे. या सर्व उपाययोजना योग्य पद्धतीने आखून त्याची अंमलबजावणी देखील होत असल्याचे आता वस्तुस्थितीदर्शक आकडेच बोलू लागले आहेत.


महानगरपालिका प्रशासनाने २२ जून २०२० रोजी मिशन झिरो या शीघ्र कृती अभियानाचा प्रारंभ केला होता. त्यावेळी मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ३७ दिवस होता. हा कालावधी २ ते ३ आठवड्यांत ५० दिवसांवर नेण्याचे लक्ष्य असल्याचे महापालिका आयुक्त श्री. चहल यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना घोषित केले होते. तसेच त्यादृष्टीने प्रशासनाने निश्चित केलेल्या आराखड्याची माहितीदेखील दिली होती. रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी १ जुलै २०२० रोजी ४२ दिवसांवर पोहोचला. तर आज ( १३ जुलै २०२०) हा कालावधी ५१ दिवसांचा आहे. 


मुंबईत दररोज कोविड रुग्ण वाढीचा सरासरी दर १ जुलै २०२० रोजी १.६८ टक्के होता. हा दर काल (दिनांक १२ जुलै २०२०) १.३६ टक्क्यांपर्यंत घसरला आहे. याचाच अर्थ रुग्ण वाढ मंदावत असून प्रशासन आपले घोषित लक्ष्य गाठण्यात यशस्वी होताना दिसत आहे. २२ जून २०२० रोजी मुंबईत उपचार घेऊन रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे सुमारे ५० टक्के होते.  १ जुलै २०२० रोजी हे प्रमाण ५७ टक्के झाले. तर १२ जुलै २०२० रोजी हा दर ७० टक्के झाला आहे.