Mumbai News : मुंबईतील वांद्रे वरळी लिंकवर (Bandra-Worli Sea Link) दोन दिवसांपूर्वी अपघातात तीन जणांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आणखी एक मोठी घटना घडली आहे. वांद्रे वरळी लिंकवरुन एका तरुणाने समुद्रात उडी मारुन आत्महत्या केली आहे. फोनवर बोलत असतानाच या तरुणाने थेट सी लिंकवरुन खाली उडी मारली. बऱ्याच प्रयत्नानंतर रात्री उशिरा या तरुणाचा मृतदेह पोलिसांना (Worli police) मिळाला. या घटनेनंतर मृत तरुणाच्या कुटुंबियांवर ऐन दिवाळीत दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वांद्रे-वरळी सी-लिंकवरून उडी मारून एका खासगी बँकेतील कर्मचारी असलेल्या 28 वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. आकाश सिंग असे मृत तरुणाचे नाव आहे. आकाश सिंगने शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास वांद्रे वरळी सी लिंकवरून उडी मारून आपले जीवन संपवले. रात्री 11:45 वाजता त्यांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. त्यानंतर त्याला वांद्रे येथील होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. मात्र तिथे पोहोचताच त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. वरळी पोलिसांच्या बोटी, अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छिमार बोटी समुद्रात या आकाशचा शोध घेत होते.


आकाश सिंग हा मध्य मुंबईतील परळ येथील रहिवासी आहे. शुक्रवारी रात्री तो वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सहून परळला जाण्यासाठी टॅक्सीत बसला होता. पण नंतर त्याने ड्रायव्हरला सी लिंकवर नेण्यास सांगितले, असे वरळी पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. सी लिंकवरुन जात असताना मोबाईल फोनवर बोलणं सुरू असताना सिंग याने अचानक दावा केला की त्याचा फोन टॅक्सीतून पडला. त्यानंतर ड्रायव्हरने सी लिंकवर टॅक्सी उभी केली. आकाश सिंग टॅक्सीतून खाली उतरल आणि त्याने थेट समुद्रात उडी घेतली. सिंग याने समुद्रात उडी मारल्यानंतर लगेचच टॅक्सी चालकाने टोल प्लाझा कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. टोल कर्मचाऱ्यांनी वरळी पोलिसांना माहिती देऊन आकाशचा शोध सुरू केला. शेवटी रात्री उशिरा आकाशचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला.


मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेच्या तीन महिन्यांपूर्वी आकाश सिंगचे त्याच्या प्रेयसीसोबत ब्रेकअप झाले होते. परळचा रहिवासी असलेला सिंग त्याच्या आई-वडिलांसोबत राहत होता आणि त्याला दोन विवाहित बहिणी होत्या. त्याच्या खिशात सापडलेल्या ओळखपत्रावरून त्याची ओळख पटली.